बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा - सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव
सांगली दि. 9 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याकरीता कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची नोंदणी करुन कामगारांना मंडळाच्या वतीने नोंदणी पश्चात पात्र बांधकाम कामगारांना विविध लाभ देण्यात येतात. यामध्ये शैक्षणिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य इत्यादी योजनांचा समावेश केला आहे. सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ मिळविण्याकरीता इतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करुन घ्यावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
या योजना असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कामगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मंडळाचे कामकाज राज्यातील सर्व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत अतिरिक्त स्वरुपाच्या कामकाजान्वये चालविण्यात येते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करुन घ्यावे. या कामकाजाकरीता कोणत्याही खाजगी प्रतिनिधी अथवा एजंट/दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तिची अधिकृत नेमणूक करण्यात आलेली नाही.
सांगली जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांनी मंडळाने ठरवून दिलेल्या नोंदणी शुल्क 37 रूपये (नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 12 रूपये एक वर्षासाठी) आकारण्यात येत असून याची रितसर पावती कामगारांना दिली जाते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच मंडळामार्फत मोफत/निःशुल्क वितरीत करण्यात येते. तरी बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंट/दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थी व्यक्तिच्या प्रलोभनाला बळी न पडता वरील सर्व अनुषंगीक कामकाजासाठी कोणत्याही व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहार करु नये. व्यवहारासंबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.