अखेर पत्रकारांचे आंदोलन आणि जनतेच्या रेट्यामुळे प्रशासन झुकले वाळू तस्करांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल कडेगाव प्रांत आणि तहसीलदारांची अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील पत्रकार सुरज जगताप यांच्यावर वाळू तस्करी ची माहिती तसेच तहसीलदार आणि प्रांत यांना दिल्यानंतर लगेचच झालेल्या हल्ल्याप्रकरणी कडेगाव तालुक्यातील वाळू तस्कर हनुमंत वाघमोडे जयपाल वाघमोडे आणि धैर्यशील बाबर या तिघांवर पत्रकार संरक्षण कायदा सह आयपीसी च्या कठोर कलमान्वये चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या आदेशाने कडेगाव चे प्रांताधिकार गणेश मरकड आणि तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांची अप्पर जिल्हाधिकारी मार्फत विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रश्नी ोलिसांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाकडून अधिकार्यांवर कारवाई होऊ नये म्हणून सुरू असलेली चालढकल लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेची संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच खानापूर तालुका व कडेगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि विटा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गेले सहा दिवस सुरू असलेले आंदोलनादरम्यान विटा कडेगाव तालुक्यांसह वांगी भिलवडी आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. काही ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको ही केला आणि पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. सर्वपक्षीय राजकीय नेते आमदार खासदार राज्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला तसेच हल्लेखोरांची गय करणार नाही असे आश्वासन दिले. जनतेतून दबाव वाढत असल्याने अखेर पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे मान्य केले आणि प्रशासनाने विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर विटा येथे पत्रकारांनी जल्लोष करून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आंदोलनाची सांगता केली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.