आरोग्यवर्धिनी केंद्र आणि पॉलिक्लिनिकसाठी महापालिकेला 9 कोटी 40 लाखाचा निधी प्राप्त : महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त कापडणीस यांची माहिती
सांगली: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातंर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला 9 कोटी 40 लाखाचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून मनपाक्षेत्रात 15 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि 2 पॉलिक्लिनिक बांधली जाणार असल्याची माहिती मनपाचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
याबाबत महापौर सुर्यवंशी म्हणाले की, आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपाक्षेत्रातील आरोग्य वर्धिनी केंद्र आणि पॉलिक्लिनिक बाबत शासनाला पाठवलेल्या प्रस्तावानुसार शासनाकडून
महापालिकेला 9 कोटी 40 लाखाचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून मनपाक्षेत्रात 15 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि 2 पॉलिक्लिनिक बांधली जाणार आहेत. यामध्ये जनरल ओपीडी असेल तसेच महिला तज्ञ, बालरोगतज्ञ आणि अन्य वैद्यकीय तज्ञ उपलब्ध असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी लागणाऱ्या डॉक्टरपासून सर्व स्टाफचे वेतन हे शासनच देणार आहे. महाराष्ट्रातील मनपाला मिळालेल्या निधीमध्ये पाचवा क्रमांकाचा निधी आपल्या महापालिकेला मिळाला आहे असेही महापौर सुर्यवंशी यांनी सांगितले.
याबाबत बोलताना आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, या निधीतून मंजूर 15 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि 2 पॉलिक्लिनिक बांधली जाणार आहेत. सध्या महापालिकेची 10 आरोग्यवर्धिनी केंद्रे आहेत. मात्र महापालिका क्षेत्रातील विस्तारित भागासाठी आरोग्यवर्धिनी केंद्राची आवश्यकता अधिक आहे.
त्यामुळे जिथं आरोग्य केंद्राची गरज आहे त्या ठिकाणी ही केंद्रे उभारली जातील. या 15 आरोग्य केंद्राची उभारणी साधारण तीन महिन्यात पूर्ण होईल त्यामुळे आता महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आरोग्यकेंद्र उपलब्ध होईल असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
