विजेसाठी प्रीपेड कार्ड; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती....
जळोची : मोबाइल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठी सुद्धा प्रीपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. जेवढ्या पैशांचा रिचार्ज केला जाईल तेवढीच वीज सबंधितांना वापरता येईल.
तुम्हाला चांगल्याप्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते. जो विजबिल नियमितपणे भरतो त्याला फटका बसणार नाही. जे विजबिल भरत नाहीत त्यांचा भार विजबिल भरणाऱ्यांवर बसतो. अलिकडे वीजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू आपल्या पॉवर प्लांटमध्ये 100 टक्के परदेशी कोळसा चालत नाही.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेची मागणी 3 ते 4 हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे. कोयना प्रकल्पातून विजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी शिल्लक ठेऊन उर्वरित पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी केले आहे.
भर दुपारी अनेक ठिकाणी वीज सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आता जिल्हा परिषदेकडून मिळणारे हायमास्ट दिवे आम्ही बंद केले आहेत. मात्र हे हायमास्ट दिवे वेळेत बंद होत नाहीत. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.
तेड करणाऱ्यांच्या नादाला लागू नका…
सध्या राज्य, देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मामध्ये जाती-जातींमध्ये तेड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. त्यांच्या राजकिय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. त्याला कदापी यश येता कामा नये.
जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबांना बसतो. दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चुल पेटते, अशा लोकांवर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
