Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

द. भा. जैन सभेने प्रा. एन.डी.बिरनाळे यांचा केला हृद्य सत्कार

 द. भा. जैन सभेने प्रा. एन.डी.बिरनाळे यांचा केला हृद्य सत्कार


दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशन समितीचे सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांची महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस सेलचे कार्याध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने निवड केली. मुंबई येथे टिळक भवनमध्ये पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. ही घटना जैन समाजाला भूषणावह आहे. या निवडीबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयात चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रा. बिरनाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब, महामंत्री शांतीनाथ नंदगावे, उपाध्यक्ष पोपटलाल डोर्ले, डॉ. चंद्रकांत चौगुले व सभा सेवक उपस्थित होते. सभेचा सत्कार म्हणजे घराचा सन्मान आहे. सभेसाठी कायम काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणार आहे असे ते म्हणाले. या निवडीसाठी महाराष्ट्राचे कृषी व अल्पसंख्याक राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम, सांगली जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील बाबा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मा. भानुदास माळी कराड यांनी शिफारस केली होती असे प्रतिपादन केले. 

प्रा. बिरनाळे हे कोल्हापूर जैन बोर्डिंगचे माजी लिपिक आहेत. सांगली जैन बोर्डिंगचे निवासी अधीक्षक म्हणून कांही काळ त्यांनी काम केले आहे. वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या मुख्य कार्यालयाचे आठ वर्षे त्यांनी प्रशासकीय कामकाज केले आहे. ते त्यावेळी जैन श्राविकाश्रम कोल्हापूर या शाखेचे लिपिक म्हणून काम पहायचे. बोर्डिंग मध्ये त्यांनी कमवा शिका योजनेत काम करुन एम.ए. बी. एड पर्यंत शिक्षण पूर्ण करून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद काॅलेजमधून संस्थेची ३३ वर्षे सेवा करुन उपप्राचार्य पदावरून गेल्या वर्षी निवृत्त झाले आहेत. ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गेली ३० वर्षे संघटनात्मक काम करीत आहेत. शिक्षण संस्था चालक संघटनेवर त्यांचे काम लक्षवेधी आहे. दहावी बारावी बोर्डाच्या प्रशिक्षण समिती व अभ्यास मंडळावर त्यांनी काम केले आहे. 

त्यांनी सार्वजनिक व्याख्याता म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकात ३६०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. गेली ३० वर्षे सतत पर्यूषण पर्वात ते तीर्थंकर विचारांचे जैन समाजात प्रबोधन करतात. स्व. दि.ब.अण्णासाहेब लठ्ठे, स्व. श्रीमंतीबाई कळंत्रे अक्का, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या जीवनावर आधारित अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत.छ.शिवाजी महाराज,छ. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान, कर्मवीर भाऊराव पाटील, पर्यावरण रक्षण इ. विषयावर सतत प्रबोधन करण्यात ते व्यस्त असतात. दक्षिण भारत जैन सभा, कोल्हापूर बोर्डिंग, वीर सेवा दल व वीराचार्य यांच्यामुळे मी घडलो असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ते करतात. जैन व बहुजन समाजात त्यांना आदराचे स्थान आहे.. दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाच्या समितीचे सेक्रेटरी म्हणून सभेने त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ते नेटाने पार पाडत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.