Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

....आणि वसंतदादा म्हणाले मी कर्नाळचा.

 ....आणि वसंतदादा म्हणाले मी कर्नाळचा.   




स्वातंत्र्यलढयात भूमिगत चळवळीचा मोठा वाटा होता. इंग्रजांच्या साम्राज्याची प्रतिके उद्धवस्त करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न भूमिगत नेत्यांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. मात्र या सर्व परिस्थितीत अनेक क्रांतीकारकांना खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. प्रसंगी मृत्यूला सुद्धा न जुमानता क्रांतिकारकांनी आपले कार्य अविरत सुरु ठेवले. अर्थात यम अगदी समोर बंदूक घेऊन उभा ठाकला असताना त्याला हुलकावणी देणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक होते स्व. वसंतदादा पाटील. 

त्याची हकिकत अशी की, १९४२ च्या स्वतंत्रलढ्यावेळी पांडू मास्तर, किसनवीर, छन्नुसिंग हे कार्यकर्ते मोर्चा आंदोलनात पकडले जाऊन त्यांना जेल मिळाला होता. पण या तिघांनी येरवडा जेल फोडून स्वतः ला मुक्त करून घेतले. यावेळी वसंतदादांचा मुक्काम कोल्हापुरातील गंगावेस तालमीत होता. पांडू मास्तर हे वसंतदादांना भेटण्यासाठी कोल्हापूरला आले होते. रात्री आठ-नऊच्या दरम्यान गंगावेस मधल्या एका खानावळीत जेवण करीत असताना पोलिसांनी खानावळीवर छापा घातला आणि सर्वांना पकडले. त्यात देशमुख नावाच्या डि.वाय.एस.पी.नी येरवडा जेल फोडून फरारी झालेल्या पांडू मास्तरांना खानावळीच्या दारातच उजेडात ओळखले. 

अटक करून सर्वांना रात्रभर लक्ष्मीपुरी पोलिस चौकीत ठेवले होते. त्यात पांडू मास्तराना दक्षता म्हणून एक स्वतंत्र खोलीत बंद करून टाकले होते. सकाळी पोलिसांना दादांनी विनंती केली की, बाबा आम्ही भूमिगतापैकी कोणी नाही. आम्ही या गावचेच आहोत. मी गंगावेस तालमीत राहतो. पण पोलिस दाद देईनात. 

दुपार झालेनंतर न रहावल्याने "चला आमच्या घरी जेवण करु आणि परत चौकीत येऊ.' असे प्रलोभन दादांनी पोलिसांना दिले. पोलिसांनाही भूक लागली असावी त्यांनीही मान डोलवत होकार दिला. 

मग वसंतदादा, रंगराव, एक पोलिस आणि एक हवालदार असे चौघेजण जेवायला निघाले. दादांनी स्वतः पैसे देत वाटेत बोलत बोलत पोलिसांना एक आईस्क्रीम खायला दिले. त्यामुळे ते दादांशी मोकळेपणाने वागू लागले. 

ही संधी साधून बिंदू चौकात आल्यावर रंगरावने पोलिसांचा डोळा चुकवून सरळ पळ काढला. रंगराव निसटला ते बघून पोलिसाने आणि हवालदाराने दादांना घट्ट पकडले. त्या दोघांचा आता दादांवर दाट संशय निर्माण झाला. 

तरीही दादांनी इथवर आलोच आहोत तर आपण घरी जेऊ आणि हवे तर मी तुमच्याबरोबर पुन्हा चौकीवर येतो असे सांगून दादांनी प्रथम पाहुण्यांच्या घरात प्रवेश केला. पाठोपाठ पोलिसही होतेच. जणू स्वतः चेच घर असल्यासारखे कुठेही न थांबता दादा सरळ आत गेले. त्यांनी सरळ आज्ञाच सुरू केल्या... मला जेवायला वाढा... मी बाहेर जाणार आहे... मला घाईचे काम आहे. आटपा लौकर...' 

दादा आत बसून जेवले आणि संडासला जाऊन येतो असे खोटे सांगून पुढच्याच दाराने पसार झाले. तिथून निसटल्यावर श्री. तात्यासाहेब कोरे यांनी दादांना आश्रय दिला. 

कोल्हापूरच्या पोलिसांना चकवा देत वसंतदादा निसटून सांगलीत आलेत हि बातमी सांगली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे दिसताच क्षणी गोळा घाला असे आदेशच इंग्रजांनी दिले होते. दादा नांद्रे गावाहून कर्नाळला निघाले होते. वाटेत वाडी जवळच्या ओढ्यात पाच सहा सशस्त्र पोलिसांनी दादांना गाठले. ते नांद्रे गावी निघाले होते. पोलिसांना भिऊन खेडतासारखा गरीब बावळट चेहरा करून दादा रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिले. 

पोलीस दादांच्या जवळ आले. थोडे थांबले. आणि दरडावून म्हणाले 'कोण रे तू ? इकडे पद्माळचा वसंत पाटील दिसला काय तुला ? सांग. एक हजार रुपयांचे बक्षीस देतो तुला.'   दादा म्हणाले, मी कर्नाळचा दादा पाटील आहे. रानाकडे गेलो होतो. मला वसंत पाटील दिसलाच नाही कुठं.' 

'भेटला तर बातमी दे' असे सांगून पोलिस दादांकडे पाहत ओढ्यातून चढून नांद्रयाकडे गेले. दादांचा त्यावेळी धोतर पागोटे असा वेष होता. दाढी होती. मिशा राखल्या होत्या. त्यामुळे ते ओळखू शकले नाहीत. यावेळी मात्र साक्षात मृत्यूलाच जणू दादांनी हुलकावणी दिली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून दादा या प्रसंगातून सहीसलामत वाचले.

#VasantDadaPatil 

#TeamVishal #sangli 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.