Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काकासाहेब चितळे

 काकासाहेब चितळे 


आजीचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा. म्हैशीची धार काढून आल्यावर ती मला उठवायची. उठवून चहा मिसळलेलं दूध प्यायला लावायची. तिची कामाची धावपळ सुरू असायची. गुरुवार असायचा त्या दिवशी ती खुश असायची. गुरुवारी दुधाचा पगार व्हायचा.ती म्हणायची,"आज बेस्तरवार हाय.दुधाचा पगार मिळलं. "रोज घरातलं कुणीही दूध घालायला जात असल तरी गुरुवारी मात्र आजीचं जायची. त्याचदिवशी गावचा बाजार असायचा. दुधाचे पैसे मिळाल्यावरच बाजार भरलेला दिसायचा.

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पगार मिळाला पाहिजे अशी एक रास्त मागणी आली होती पण या मागणीच्या अगोदरच आमच्या भागात 'दुधाच्या पैशाला पगार म्हणायची प्रथा पडली होती. नोकरी न करणाऱ्या शेतकऱ्यांना तो पगार वाटायचा. आणि तो पगार वाटावा अशी त्यात नियमितता होती. 'काहीही होवो पगार गुरुवारी मिळणार म्हणजे मिळणार.' ही शिस्त काकासाहेब चितळे यांनी घालून दिली होती.

रानात गुर घेऊन गेल्यावर आपल्याला जनावरांना चांगला चारा मिळाला पाहिजे म्हणून आम्हा सगळयाचा पोरांचा प्रयत्न असायचा. ज्या बांधावर जास्त गवत असेल तिथं आपली जनावरे घेऊन जायचं. ज्या माळाला गवत असेल तिथं सगळ्याच्या अगोदर गुर नेऊन चारायची अशी स्पर्धा होती. गुरांना विशेषतः दुभत्या जनावरांनी जास्त चांगलं चुंगल खाल्लं पाहिजे यावर आमचा भर असायचा. कारण हीच जनावर दूध द्यायची आणि त्या दुधातून आम्हाला पैसे मिळतात हीच आम्हा शाळकरी पोरांची समज होती. आपलं दूध ज्यांच्याकडे जात तो चितळे नावाचा माणूस खूप भला वाटायचा कारण दर गुरुवारी तो पैसे पाठवायचा. पैसे घरात आले की वातावरण बदलायचं. गुरुवार हाच आमच्या शेतकरी कुटुंबातील चांगला वार वाटायचा. गावातला दूधवाला दूध गोळा करतो. ते दूध न्यायला चितळेचा ट्रक येतो पण त्या दुधाचं पुढं काय केलं जातं?हे कळण्याचं वय नव्हतं. मात्र दर गुरुवारी पगार देणाऱ्या चितळे यांच्याबद्दल एक दिवस आजोबांना विचारलं

"चितळे कुठं राहतो?"

"भिलवडीत."एवढं उत्तर मिळालं.

मग चितळे यांचा दुधाचा टँकर बघितला की हमखास चितळे यांची आणि गुरुवारची आठवण यायची. त्या काळात त्यांना जाऊन बघण्याची इच्छा व्हायची पण आम्ही तोवर गावाच्या शिवाही ओलांडल्या नव्हत्या.बारकी पोर होतो आम्ही.

नंतरच्या काळात चितळेना समजून घेता आलं. चितळे हा एक पॅटर्न आहे. शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय?हे चितळे यांच्या कुटूंबाची कथा समजून घेताना लक्षात येत.आज चितळे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती चितळे  मिठाईची प्रशस्त दुकान.चितळे हा एक ब्रँड झाला आहे मात्र कधीकाळी चितळे बंधूंनी सायकलीवरून दूध गोळा केलं होतं.गावोगावी फिरून दूध गोळा करणाऱ्या चितळेनी आपल्या कष्टाच्या जोरावर चितळे उद्योगसमूह उभा केला आणि वाढवला.कठोर परिश्रम ,सचोटी ,लोकाभिमुखता हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

चितळे आणि वक्तशीरपणा यांच एकच उदाहरण म्हणजे गेल्या वीस वर्षांपूर्वी चितळेची दुधाची गाडी रस्त्यावरून गेली की लोक म्हणायची "चार वाजले,साडेचार वाजले."ज्या गावात ती गाडी रोज ज्या वेळेला जायची.त्यात बिलकुल बदल होत नव्हता.चितळेची गाडी हेच घडयाळ नसलेल्या रानामाळात राबणाऱ्या लोकांचं घड्याळ बनलं होतं यावरून चितळे उद्योगसमूहाच्या वक्तशीरपणाची कल्पना यावी.

काकासाहेब चितळे यांच्यासारखा माणूस फक्त उद्योजक म्हणून समाजात कधी वावरला नाही.त्यांच्यात एक कार्यकर्ता दडलेला होता.हा कार्यकर्ता सतत दिसायचा.अवघ्या उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला हा माणूस आपल्या गावाला कधीही विसरला नाही.एका बाजूला उद्योगपती असलेले काकासाहेब चितळे यांनी गावकऱ्यांची भूमिका सक्षमपणे पार पाडली. त्यांच्या भिलवडी गावातील कोणताही माणूस त्यांना सहज भेटत होता,आपल्या अडचणी सांगू शकत होता.गावात ते गावकऱ्यासारखेच राहिले.गावातील कोणत्याही उपक्रमात ते अग्रभागी असायचे.ग्रामस्वच्छता अभियानाच्या चळवळीपासून ते अगदी वाचन चळवळीपर्यंत त्यांचा सहभाग असायचा.चांगले उपक्रम आणि चांगली पुस्तके यांच्याबद्दल ते भरभरून बोलायचे.

काकासाहेब जसे त्यांच्या घरच्या लोकांना आपले वाटायचे तसे कृष्णाकाठच्याच नाही तर ज्या ज्या गावात चितळेची शाखा आहे. ज्या गावात त्यांचा टँकर दूध गोळा करायला जातो त्या प्रत्येक गावातील माणसाला काका आपले वाटत होते. त्यांचा आधार वाटत होता.महापूर आला तेव्हा सगळ्याना धीर देणारे काका मी पाहिले आहेत.

उद्योग करणारे तरुण पुढे आले पाहिजेत अस काकांना वाटायचं त्यामुळं एखादा त्यासाठी मदत मागायला आला तर काका त्याला भांडवल द्यायचेच पण त्याच्या उद्योगाच्या उद्घाटनालाही जायचे.त्याला प्रोत्साहन द्यायचे.असे अनेक छोटे व्यावसायिक त्यांनी उभा केले.

चितळेनी उद्योग क्षेत्रात भरारी मारताना त्यांच्यातील संवेदनशीलता तितकीच जागृत ठेवली. त्यामुळे एखाद्याच्या सुखात प्रत्येकवेळी जाणे त्यांना जमले नसेल  पण दुःखात ते नेहमी लोकांच्यासोबत राहिले.एवढ्या मोठ्या व्यापातून सुद्धा त्यांनी आपलं गाव,कृष्णाकाठ यांच्याशी अखेरपर्यंत आपली नाळ जोडून ठेवली होती.

संपत मोरे

8208044298


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.