Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'जगू द्याल की नाही? बंद कर ते.', मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले!

 'जगू द्याल की नाही? बंद कर ते.', मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले!


पुणे : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुनही राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे हे आपल्या भाषणशैलीमुळे आणि रोखठोक वक्तव्यांमुळे माध्यमांमध्येही नेहमीच चर्चेत असतात. तर कधी ते माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापलेलेही पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. तिथे त्यांनी अनेक पुस्तके चाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची काही पुस्तके विकतही घेतली. तसंच तिथे उपस्थित वाचकांना त्यांनी ऑटोग्राफही दिला. मात्र, जेव्हा ते गाडीतून उतरले त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापल्याचं पाहायला मिळालं.


का संतापले राज ठाकरे?

त्याचं झालं असं की राज ठाकरे हे अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी आले असता, तिथे अनेक माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कॅमेरावर फोकसही लावण्यात आला होता. मात्र, त्याचा त्रास जाणवू लागल्याने राज यांनी ते बंद करायला लावले. त्यावेळी थोडं पुढे येत काय जगू द्याल की नाही? बंद कर ते.. वेगळं सांगू का सगळ्यांना? असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंकडून केतकी चितळेचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं. एकीकडे जातीवादाच्या मुद्द्यावरुन पवारांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा चांगलाच समाचार घेतलाय. 'आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येण साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे', अशा शब्दात राज यांनी केतकीच्या पोस्टचा समाचार घेतला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.