Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुठे ते अचार्य अत्रे... आणि कुठे ‘हे’!

 कुठे ते अचार्य अत्रे... आणि कुठे ‘हे’!अचानकपणे एका तरुण पत्रकार मित्राचा फोन आला. बरेच दिवसांनी बोलणे झाले. त्याने विचारले की, ‘आजच्या वृत्तपत्रांत आरोप-प्रत्यारोप याची स्पर्धा लागलेली आहे. तुमच्या काळातील पत्रकारितेमध्ये आचार्य अत्रे यांना तुम्ही जवळून पाहिलेत... त्यांच्या ‘मराठा’ मधूनही असे अनेक बाँम्ब टाकले गेले. त्यासंबंधी काही माहिती सांगाल का?... ’

त्या आगोदर त्याने कालची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याची थोडी चर्चा केली. माझी अकारण स्तुतीही केली. मी त्याला एवढेच म्हटले, ‘तुझ्या भावनेबद्दल आभार... एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराबद्दल चांगले बोलतो आहे, हे काही कमी नाही. पुढच्या काही काळात हे ही अवघड आहे...’ त्याने बरीच माहिती विचारली... मी त्याला सुचविले की, ‘आजच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोप सर्रास सगळ्या वृत्तपत्रांत आहेत. सर्व वाहिन्यावाले तर याकरिता टपून बसलेले आहेत. त्यांना त्यांचे दुकान चालवायचे आहे. आणि दुकान चालवण्यासाठी हे असे खुराक त्यांना खूप कामाचे आहेत. वाचनाची गरज नाही, चिंतनाची गरज नाही, दर्जेदार लेखनाची गरज नाही. दे दणादण.... असे आजचे राजकारण आहे... आणि अशीच आजची पत्रकारिता आहे.’ 

तरीही तो आग्रह करू लागला की, ‘आचार्य अत्रे यांच्या काळात फुटलेले बॉम्ब सांगा...’ मी त्याला पुन्हा सांगू लागलो... ‘हा फार मोठा विषय आहे. शिवाय आजच्या आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आिण आचार्य अत्रे यांनी जे घणाचे घाव घातले त्याची तुलनाच होणार नाही. त्यावेळी त्यांनी जे बॉम्ब टाकले ते बॉम्ब केवळ धमाका करून गेले नव्हते तर, धरणीकंपासारखे अनेकांना पोटात गिळून गेले.’ मग त्याला काही उदाहरणे सांगितली... ‘पहिली गोष्ट म्हणजे, आजच्या राजकारणातीली जी घाण एकमेकांच्या अंगावर ओतण्याचे काम सुरू आहे... असले राजकारण महाराष्ट्रात कधीच नव्हते. त्यावेळी विचारांची लढाई होती. विधानसभा किंवा विधानपरिषद येथील चर्चा तासंनतास चालायच्या आिण त्या सर्व चर्चेत फार मोठा अभ्यास, चिंतन असायचे. महाराष्ट्राची खरी बांधणी त्या चर्चेतील निर्णयांनी झालेली आहे. अचार्य अत्रे यांनी ‘मराठा’तून जे बॉम्ब टाकले त्याचे स्वरूप व्यक्ती द्वेषाचे नव्हते. आजचे स्वरूप व्यक्तीद्वेषाचे आहे. ठरवून सभागृहात यायचे... आिण हल्ला करायचा... वृत्तपत्रांकडे त्याची माहिती आधीच पोहोचलेली असायची... ५० वर्षांच्या पत्रकारितेत काही प्रमाणात ‘नवाकाळ’ आणि आचार्य अत्रे यांचा ‘दैनिक मराठा’ यांनी जे घाव घातले ते सामाजिक स्वरूपाचे होते. महाराष्ट्राच्या िहतासाठी यातील अनेक विषय हाताळले गेले. त्याला एक उदाहरण सांगितले.... संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आर-पारनिर्णयावर आली असताना मुंबई महापालिकेतील त्यावेळच्या काँग्रेसचे नगरसेवक नानू निच्छा पटेल यांनी सभागृहात आरोप केला की,.... जर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होवून मराठी राज्य झाले तर हे मराठी लोक गुजराती स्त्रियांवर बलात्कार करतील...’ नानू निच्छाच्या आरोपाने त्यावेळी महापालिका सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्याचे पडसाद वृत्तपत्रांत उमटले... त्यावेळच्या गुजराती वृत्तत्रांनी याची हेडलाईन केली आिण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी या आरोपाचा वापर महाराष्ट्राच्या विरोधकांनी केला. दहा दिवसांत आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’त एक जाहिरात टाकली... ‘नानू निच्छाच्या पापाचा उद्याच्या अंकात पंचनामा.... बलात्कार करणारा कोण?...’ 

दुसऱ्या दिवशीच्या ‘मराठा’त काय छापून येणार याची प्रचंड चर्चा होती. त्या अंकावर वाचकांच्या उड्या पडल्या. आचार्य अत्रे यांनी नानू निच्छाला पूर्ण उघडा केला. त्यांने आरोप केला होता.... संयुक्त महाराष्ट्र झाला तर गुजराती स्त्रियांवर मराठी लोक बलात्कार करतील... याच नानू निच्छाने त्याच्या घरी काम करणाऱ्या मराठी मोलकरणीवर बलात्कार केल्याचा पुराव्यानिशी सगळा तपशील मराठामध्ये प्रसिद्ध झाला. नानू निच्छाच्या आरोपाने जी खळबळ उडवली होती. त्याचे काय झाले असेल हे सांगण्याची गरजच राहिली नाही... या ‘बॉम्ब’मध्ये (त्यावेळी पेनड्राईव्ह नव्हते) व्यक्तीद्वेषाचा कुठेच विषय नव्हता. राजकीयदृष्ट्या कोणी, कोणाला संपवायचे, असे डावपेच नव्हते. महाराष्ट्राच्या हिताचे जागते पाहरेकरी म्हणून ही आग ओकणारी पत्रकारिता होती. आताच्या एकमेकांच्या अंगावर आपलीच घाण ओतण्याची जी घाणेरडी स्पर्धा लागलेली आहे, एवढे महाराष्ट्रातील राजकारण कधीच गलिच्छ नव्हते. 

आणखी एक उदाहरण सांगता येईल, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्मे झाले. सामान्यपणे असे म्हटले जाते की, १०५ हुतात्मे झाले. मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा जो आदेश दिला होता’ (मारा आिण मरेपर्यंत मारा- शूट अॅट साईट अॅण्ड शूट टू किल...) या गोळीबारात १०५ शहीद झाले. १०६ वा सत्याग्रही िसताराम दुलाजी घाडीगावकर हा प्रत्यक्ष गोळीबारात मारला गेला नाही.... पोलिसांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले... आिण त्याच्या िखशात एक बनावट प्रेमपत्र घालून ‘त्याने आत्महत्या केली’, असे भासवले.  आचार्य अत्रे यांनी या प्रकरणाचा तपास त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत (मराठातील वार्ताहरांचा एक संच याकरिता खूप मेहनत आणि धोका पत्करून काम करत होता.) सगळी माहिती खणून काढली. विधानसभेतही आचार्य अत्रे यांनी हे प्रकरण उपस्थित केले. १९५७ ते १९६२ आिण १९६२ ते १९६६ असे ९ वर्ष ते आमदार होते. (बेळगाव-कारवार सीमा प्रश्न सुटत नाही, सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळत नाही म्हणून, त्यांनी आपल्या आमदारकीपदाचा राजीनामा १९६६ साली सादर केला.)  घाडीगावकर याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रासाठी घेतला गेलेला बळी आहे. म्हणून तो हुतात्मा आहे. आिण १०५ नव्हे तर १०६ हुतात्मे आहेत. याची तपशीलवार कथा आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’तून दहा िदवस सादर केली. प्रकरण हायकोर्टात गेले आिण तेथे ही गोष्ट सिद्ध झाली की, ‘अनंत घाडीगावकर याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे....’ 

मी माझ्या त्या मित्राला अशी अनेक उदाहरणे सांगत होतो... आणि त्याचवेळी त्याला हे ही म्हटले, ‘आजच्या मस्तवाल आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांशी, राजकारणाचा शिमगा करणाऱ्यांशी याची तुलना कशी होईल?... अशी तुलना करायला जाशील तर तुझे हसे होईल. कुठे आचार्य अत्रे आणि कुठे आजचे संपादक झालेले पुढारी...आणि शिवीगाळ करणारे नेते....पेनड्राईव्हवर राजकरण करणारे नेते...’ सामान्य माणसांच्या प्रश्नांना आज कोणत्या वृत्तपत्रांत जागा आहे? सामान्य माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी, त्यांच्यावरचे अन्याय, वाढती महागाई, बेरोजगारी... मुंबईसारख्या शहरात एक खोलीसाठी वणवण भटकणारा कामगार.... आणि त्याच्या डोळ्यासमोर लागलेले... ‘2 बी.एच.के’ दोन कोटी ४० लाख’ हे फलक... सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणारा नेताही नाही. आणि व्यासपीठही नाही. कोणताही राजकीय पक्ष सर्वस्व पणाला लावून या सामान्य माणसासाठी बोलतोय, असे गेले कित्येत दिवसांत उदाहरण नाही. त्याकाळाची आिण या काळाची, त्या नेत्यांची आणि या नेत्यांची, त्या संपादकांची आिण आजच्या संपादकांची कुठे चर्चासुद्धा होणार नाही. आजचे कोणतेच वृत्तपत्र संपादकारिता घेतलेच जात नाही. कोण संपादक काय म्हणतोय.... याच्याशी कोणाल काही पडलेले नाही. आचार्य अत्रेंच्या नवयुगमधला त्यांचा आग्रलेख आिण दत्तू बांदेकरांचा ‘सख्या हरी’ वाचण्याकिरता वाचकांच्या उड्या पडायच्या... आज असे संपादक कुठे मिळणार आहेत....? ‘मराठा’च्या रविवारच्या अग्रलेखात एक पैशाचे राजकारण नसायचे.... आचार्य अत्रे यांच्या प्रासादिक लेखणीतून उतरलेले असे असंख्य रविवारचे ते अग्रलेख जीवनात केवढी मोठी उर्जा आणि आनंद द्यायचे... ते दिवस संपले... ते नेते संपले... ‘आषाढस्य प्रथम दिवसे’,‘गानकोकीळा’, ‘यशवंत हो... जयवंत हो...’ ‘माझा बाबू गेला...’, ‘असा गंधर्व पुन्हा न होणे’, ‘आम्ही जिकलो... आम्ही हरलो..’, ‘इतका लहान- इतका महान’, ‘सूर्यास्त’ (पंडित नेहरूंच्या निधनानंतरचे दहा अग्रलेख....) असे पुन्हा कधी होणे नाही. 

याचा अर्थ सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील ही मंडळी सत्तेला शरण गेलेली नव्हती. पण जे चांगले आहे त्याला डोक्यावर घेणे आिण जे चुकीचे चालले आहे, त्याच्यावर तर्कनिष्ठ मुद्द्याने सरकारच्या चुका दाखवणे यात कुठेही संकोच नव्हता... शिवीगाळ नव्हती... प्रश्नोत्तराचा तास म्हणजे मंत्र्यांची कसोटी होती. सभागृहात एकमेकांवर वैचारिकदृष्ट्या तुटून पडणारे,  सभागृहाची बैठक संपताच एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून  कॅन्टीनला चहा प्यायला जाणारे अनेक आमदार मी पाहिलेले आहेत. तशी विधानसभा आता होणे नाही.... 

आचार्य अत्रे आणि त्यांचा ‘मराठा’ सरकारवर तूटून पडणारे होते. पण, ज्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री (अॉक्टोबर १९६२) म्हणून बोलावले त्यानंतर विधानसभेत यशवंतरावांच्या अभिनंदनाचा ठराव आला. त्या ठरावावर बोलताना आचार्य अत्रे यांनी दहा िमनीटांच्या भाषणात यशवंतरावांच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. अत्रेसाहेब म्हणाले होते, ‘यशवंतराव, या सभागृहात विरोधी आमदार म्हणून मी तुम्हाला अनेकवेळा विरोध केला. त्यात तुमच्याबद्दल अनादर नव्हता. सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आग्रह होता. आज आपले भांडण िमटले आहे. देशात १८ राज्ये आहेत... त्यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याच्ाा चेहरा देशाच्या पंतप्रधानांना आठवला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा पंतप्रधानांना आठवला... तुम्ही संरक्षण मंत्री म्हणून जा... यशवंत आहातच... जयवंत होवून या...  तुम्ही शत्रूला धूळ चारल्यावर हा छत्रपतींचा महाराष्ट्र  तुम्हाला डोक्यावर घेईल. महाराष्ट्रात याल तेव्हा आकाशातून छत्रपती तुमच्यावर पुष्पवृष्टी केल्याशिशवाय राहणार नाहीत....’ साहेबांच्या शब्दांनंतर यशवंतरावांनी िखशातून रूमाल काढला आिण डोळ्यांतून वाहणारे अश्रू आवरले... अशी विधानसभा आता पहायला िमळणार नाही. असा मुख्यमंत्री पहायला मिळणार नाही... आणि असे विरोधी नेतेही आता पहायला मिळणार नाहीत.... 

  १९६८ सालची गोष्ट सांगतो... ‘आमदार कृष्णा देसाई हे कम्युनिस्ट.... नागपूरच्या विधानसभा अिधवेशनात ते आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेवून आले होते. त्यावेळी नागपूर अिधवेशनात विरोधी पक्षाकरिता भारतीय बैठक लोड, गाद्या, तक्के अशी बैठक असायची.... कृष्णा देसाईंची लक्षवेधी होती. आणि ती जनसंघाच्या विरोधात होती... कृष्णा विरोधी पक्षाच्या कार्यालयात आपल्या मुलाला खेळवत बसला होता. त्याला सभागृहात जायचे होते. मुलाला कोण सांभाळणार? तेवढ्यात समोरून जनसंघाचे आमदार रामभाऊ म्हाळगी येत होते... कृष्णा देसाईंनी त्यांना हाक मारली... कसे हाक मारली... ‘ए रामभाऊ, इकडे ये.... तुझ्या पक्षाच्या विरुद्ध माझी एक लक्षवेधी आहे... माझ्या मुलाला अर्धा तास सांभाळ... मी सभागृहात जावून येतो... ’ रामभाऊ म्हाळगी हसत म्हणाले, ‘एकदम छान सांभाळतो....’ कृष्णा सभागृहात गेला... तो येईपर्यंत रामभाऊ त्याच्या मुलाला सांभाळत होते. गोष्टी सांगत बसले होते. माझ्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिला... त्यावेळच्या ‘मराठा’त एक छान चौकट टाकून बातमी केली... त्याचे िशर्षक होते.... ‘कम्युनिस्ट  आमदाराच्या मुलाला सांभाळणारे जनसंघाचे आमदार....’’ 

त्यावेळी सत्ताधारी-विरोधक आणि विरोधी बाकावरच्या आमदारांमधील वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांमधील नाते असे प्रेमाचे होते. त्यात द्वेष नव्हता. सत्ताधारी आिण विरोधक यांच्यात सूड भावना नव्हती. आज सगळेच बदलले आहे. िदल्लीतून चावी हालली की येथे धाडी पडू लागतात.. विरोधक आिण सत्ताधारी द्वेषाची भाषा बोलू लागतात. लोकशाहीची सगळी पत्थे जणू आता चटई गुंडाळून ठेवावी, इतक्या सहजपणे गुंडाळून ठेवली जात आहेत. तो महाराष्ट्र आज कुठे राहिला आहे?....

त्या पत्रकार मित्राला सांगितले, ‘अरे, अशी तुलना करू नकोस... तेव्हाच्या विरोधकांना आपण विरोधी बाकावरच बसले पाहिजे, लोकांचे प्रश्न लढवले पाहिजेत, यात कमालीचे समाधान होते. सत्ताधारी बाकावर जाण्याची त्यांची कधी इच्छाही नव्हती. आिण आतासारखी भले-बुरे मार्ग पत्करून ‘कसंही करून पुन्हा एकदा’ अशी भाषाही नव्हती. नेते बदलले... भाषा बदलली... निती बदलली... चारित्र्यही बदलले... सर्वच काही बदलले आहे. आिण हे सगळे पुन्हा लोकशाहीच्या नावाखाली बदलले आहे. तुलना करायची तर अशी कर... कुठे ती मोठी माणसे आिण कुठे आजचे? कशाची काही तुलना हाऊ शकते का?’

- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.