भोंग्यावर अजान होणार नाही, पण साईंची आरती सुरू ठेवा; जामा मशीद ट्रस्टचं पोलिसांना निवेदन
शिर्डी: मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दिला होता.
काही मशिदींसमोर मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावली. काही ठिकाणी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं. बऱ्याचशा ठिकाणी दोन्ही धर्मांनी समजूतदारपणा दाखवत सलोख्याचं दर्शन घडवलं.
परिस्थिती बिघडू नये म्हणून शिर्डीतील जामा मशिदीनं महत्त्वाचा निर्णय घेतला. पहाटेची अजान लाऊड स्पीकरवर होणार नाही. पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका. त्यावेळी भोंगे सुरूच राहू द्या, असं म्हणत जामा मशिदीच्या विश्वस्तांनी मनाचा मोठेपणा दाखवला. अजानसाठी भोंगे लावणार नाही. मात्र साईबाबांची आरती भोंग्यांवरून होऊ द्या, अशी भूमिका विश्वस्तांनी घेतली. यासाठी त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आणि विनंतीही केली.
शिर्डीतील मुस्लिम समाजानं आणि जामा मस्जिद ट्रस्टनं काकड आरती, शेजारती भोंग्यांवरच व्हावी. त्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नयेत, अशी मागणी केली आहे. 'शिर्डी हे सर्वधर्मसमभावाचं प्रतीक आहे. राज्यात सध्या भोंग्यांचा विषय तापला आहे. त्यामुळे आम्ही भोंगे बंद करण्याचा निर्णय घेत आहोत. मात्र काकड आरती, शेजारतीच्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नयेत', असं जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमुशुद्दीन इनामदार म्हणाले. याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाला पत्रदेखील दिलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.