दोन अभियंत्यांना लाच घेताना पकडले; एकाच ऑफिसमध्ये ए.सी.बी.ची कारवाई
पुणे : प्रत्येकी वीस हजार रुपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील दोघा अभियंत्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय ५६),
कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे (वय ३७)
अशी दोघांची नावे आहेत. प्रत्येक दिवशी पाचपेक्षा अधिक टँकर भरून देण्यासाठी व अनामत रकमेचे बिल काढण्यासाठी दोघांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारली आहे.
या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत ६३ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. ए.सी.बी.ने दिलेल्या माहितीनुसार, उपअभियंता मधुकर थोरात व कनिष्ठ अभियंता अजय मोरे हे दोघे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागात काम करतात. तक्रारदार यांचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पास त्यांनी महापालिकेच्या कार्यालयातून घेतले आहे. प्रत्येक टँकर भरताना त्यांना एक पास द्यावा लागतो. मात्र पास देऊनही अभियंता मोरे याने दरदिवशी पाचपेक्षा अधिक टँकर भरून हवे असतील, तर महिन्याला २० हजार रुपयांची मागणी केली.
तसेच अभियंता थोरात यानेदेखील तक्रारदार यांच्या अनामत रकमेचे बिल काढण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दाखल तक्रारीची पडताळणी केली असता, दोघा अभियंत्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, सायंकाळी बंडगार्डन पाणीपुरवठा कार्यालयात सापळा रचून दोघांना प्रत्येकी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपतच्या पथकाने पकडले.
कार्यालयात रंगली खुमासदार चर्चा....
बंडगार्डन येथील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दोघा अभियंत्यांविरोधात एकाच वेळी एकाच कार्यालयात ए.सी.बी.ने कारवाई केली. मात्र याचा थांगपत्ता दोघांनाही नव्हता. त्यामुळे कारवाईची माहिती सर्वत्र पसरताच कार्यालयात खुमासदार चर्चा रंगली होती. एकाने जादा टँकर भरून देण्यासाठी तर दुसर्याने बिल काढण्यासाठी प्रत्येकी २० हजारांची मागणी केली. ए.सी.बी.च्या पथकाने अतिशय दक्षता घेऊन एकमेकांना सुगावा लागू न देता एकापाठोपाठ कारवाई केली. बहुदा एकाच कार्यालयात दोन कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
