संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याने चौधरी संतापले; म्हणाले....
मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. हीच टाळाटाळ त्यांना महागात पडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आपला राग फेसबुक पोस्टमधून व्यक्त केला आहे. ते म्हणाले, राज्यातल्या नागरिकांनी संजय राऊतांची आजची अटक पाहून ठेवावी. सुडाच्या राजकारणानं परमावधी गाठली आहे.
मोदी शहा जे करत आहेत, त्याकडे राज्य भाजपाचे नेते मोठ्या मजेत पहात आहेत पण या सुसंस्कृत राज्याचं राजकारण इतक्या सुडबुद्धीकडे नेण्याच्या पापात ते ही सहभागी आहेत. संपूर्ण राज्य बदनाम होत आहे. सत्तेसाठी व्याकुळ होते. ती सत्ता मिळाली. आता सूड घेण्यासाठी आसुसलेले आहेत. यांच्या डोक्यातून सूड जाता जात नाही. राज्यातली जनता सर्व काही पहात आहे. कोणाचीच मस्ती जनता सहन करत नसते. लोक जागा दाखवून राहतील.
संजय राऊतांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण सिंचन घोटाळ्यात दादांना फडणवीसांनी दिलेली क्लीनचिट या राज्यानं पाहिलेली आहे. हे अति होतंय. यावच्चंद्रदिवाकरौ आपलीच सत्ता राहणार या भ्रमातून हे होतय. जनता रस्त्यावर आली तर भ्रम तुटायला चोवीस तास पुरतात. असं चौधरी यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
