Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला चांगलेच खडसावले; हे आहे कारण.

 मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला चांगलेच खडसावले; हे आहे कारण.


मुंबई : आदेशाची अंमलबजावणीच होणार नसेल, तर आदेश देण्याला अर्थ काय? आदेशाच्या अंमलबजावणासाठी गृहमंत्री तर असायला हवेत ना? अशी मिश्किल टिप्पणी करीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी खाते वाटप झाले नव्हते. राज्याला गृहमंत्री नसल्याने ही परिस्थिती उदभवल्याचेही स्पष्ट झाले.

शस्त्र परवाना नाकारण्याच्या ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाविरोधात केलेल्या अपिलावर राज्याच्या गृहमंत्र्यांना सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका एका वकीलाने दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही मिश्किल टिप्पणी केली. अमृतपालसिंह खालसा यांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने गृहमंत्र्याबाबत केलेल्या टिप्पणीनंतर खालसा यांनी नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारी प्रकरणे अशी प्रलंबित ठेवू शकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी स्थगित केली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि मंत्र्यांच्या शपथवविधीची वृत्त दररोज दिली जात आहेत याकडेही खालसा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर शपथविधी रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. जानेवारी २०२० मध्ये खालसा यांनी शस्त्र परवान्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला होता. शस्त्रास्त्र कायद्यानुसार, पोलीस आयुक्तांना हा परवाना देण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांच्या अर्जावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही आणि त्यांचा अर्ज दाखल केल्यापासून ते याचिका दाखल करेपर्यंत ४०७ दिवस प्रलंबित ठेवण्यात आला, असा दावा खालसा यांनी याचिकेत केला आहे.

खालसा यांनी २०२१ मध्ये उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यात ते काही संवेदनशील प्रकरणे हाताळत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळेच त्यांनी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून शस्त्र परवाना देण्याची मागणी केली होती. ठाणे पोलीस आयुक्तांनी १७ जून २०२१ रोजी खालसा यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे खालसा यांनी या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

दि.१५ मार्च २०२२ रोजी खालसा यांची याचिका न्यायालयाने निकाली काढताना पोलीस आयुक्तांच्या आदेशाविरोधात राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अपील करण्याची मुभा त्यांना दिली. तसेच खालसा यांनी अपील केल्यास अपिलीय अधिकारी असलेल्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. परंतु तेथेही अपील प्रलंबित असल्याने त्यावर सुनावणी घेण्याचे आदेश गृहमंत्र्यांना द्यावेत, या मागणीसाठी खालसा यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.