Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंनी सांगितली अमित शाहांसोबतची बंद दाराआडची चर्चा

उद्धव ठाकरेंनी सांगितली अमित शाहांसोबतची बंद दाराआडची चर्चा


मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात आले होते. मुंबईत उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे तसंच निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली. आम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागत होतो, आता भाजपने तेच केलं आहे. मग आम्ही आधी हेच सांगत होतो. आमचं ऐकलं असतं तर हे नाटक घडलंच नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

'जो सोबत राहिल त्याला वाटा मिळणार, महाविकासआघाडी कशी झाली हे सर्वांना माहिती आहे. निवडणूक आयोगाने माझा धनुष्यबाण चोरला, मात्र आता श्रीराम माझ्यासोबत आहे. मी कालच आव्हान दिलं, चोरलेले धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. मी भाजपला सोडलं हिंदुत्व सोडलं नाही. यांचं हिंदुत्व भांडण लावणारे आहे,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'दूध का दूध पानी का पानी झालं, असं अमित शाहा म्हणाले, पण अजून तसं झालेलं नाही, अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाकी आहे,' असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. 'मी काँग्रेससोबत नाही गेलो, भाजपने मला मजबूर केलं. युती मी नाही तर भाजपने तोडली.

अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी युती तोडली. अमित शाह माझ्या घरी आले होते, तेव्हा अमित शाहांनी सांगितलं ठीक है, सत्तेत समान वाटा मिळेल. बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिलं होतं. एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, आजही ते कायम आहे,' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. 'हे राजकारण कुणाला आवडणारं आहे? सर्व यंत्रणा लांडगे आहेत, कुत्रा तरी इमानदार असतो. जे देश वाचवायला बसले आहेत, त्यांच्यामुळे देश कमजोर होत आहे. प्रमोद महाजन होते तेव्हा सर्व खुलेपणा होता.

बाळासाहेबांनी तेव्हा प्रमोद महाजन यांना सांगितलं होतं, एक दिवस हिंदू म्हणून आपण मतदान करणार. निवडणुका आल्या की हिजाबचा मुद्दा आणतात, आता कुठे आहे? या देशाला मातृभूमी मानणारा प्रत्येक जण आमचा बंधू आहे,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. 'मी काँग्रेससोबत गेलो की मी हिंदुत्व सोडलं, तुम्ही मुफ्ती मोहम्मदसोबत गेले होते तेव्हा काय सोडलं होतं? काल जे झालं तो अन्याय आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं पण माझ्या घरावर हक्क सांगत आहेत. तुम्हाला माझ्या वडिलांचा चेहरा पाहिजे, त्यांचा मुलगा नको. मी काय मागत होतो, हेच मागत होते पण दिले नाही.

जर तेव्हाच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर हे नाटक घडलंच नसतं. पण जे होतं ते चांगलं होतं,' असं म्हणत ठाकरेंनी भाजपला आणि शिंदेंना टोला हाणला. 'मुंबईला दासी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईच्या ठेवी 645 कोटींवरून हजारो कोटींवर गेल्या. पंतप्रधान येऊन सांगतात, बँकेत पैसे ठेवून विकास होत नाही. पण त्याच पैशातून कोस्टल रोड निर्माण होत आहे. सगळं गुजरातला घेऊन चालले आहेत, त्यावर शिवसेना बोलते म्हणून संपवा त्याला,' असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांनाही आवाहन केलं.

'साथ देणार असाल तर निभावा. जेव्हा कोरोना काळात उत्तर भारतीय घरी जात होते, तेव्हा विरोध केला. पण तरीही मी एसटीने सर्वांना सोडलं, मात्र तेव्हाही उत्तर प्रदेशमध्ये पाणी सुद्धा नाही मिळालं, म्हणून सुख दु:खात साथ राहा. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, सर्व भारतीयांची आहे. लोकशाही वाचवायची असेल तर पूर्ण ताकदीने उतारवं लागेल. अशा चर्चा सर्व ठिकाणी घेऊ, ठाण्यातही घेऊ. निवडणुकीत आपण उत्तर भारतीय असता आणि मी मराठी, असं का?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीय मतदारांना हाक दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.