Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरातील आणखी एक माजी आमदार शिंदे गटाच्या गळाला

कोल्हापुरातील आणखी एक माजी आमदार शिंदे गटाच्या गळाला


कोल्हापुरात अनेक राजकीय घटनांचा अर्थ काढणारा तसेच भुवया उंचावणारा रविवार ठरला. एकिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जिल्हा भाजपमय करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे रविवारचा राजकीय धुळवडीचा ठरला. अशातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील बंडखोरीनंतर तळ्यात मळ्यात भूमिकेत असलेल्या माजी आमदार चंद्रदीप नरके यांची अमित शाह यांच्या स्वागताला असलेली उपस्थितीही राजकीय भुवया उंचावणारी ठरली. नरके यांच्यासह ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडेही यावेळी उपस्थित होते. नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला लपूनछपून उपस्थिती लावली होती. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वागताला थेट लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली. नरके हे भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली होती.

मात्र, त्यांनी स्वागतानंतर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी शिवसेना आणि धनुष्यबाणाचाच आहे. पहिल्यापासून माझी हीच भूमिका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच शिवसेनेतून आणि धनुष्यबाण चिन्हावर मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. चंद्रदीप नरके म्हणाले की, धनुष्यबाण घेऊनच मी महायुतीचा उमेदवार म्हणून करवीरच्या रिंगणात उतरणार आहे. नरके यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत कुंभीचे संचालक अजित नरके, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.

करवीरमधून दोनवेळा आमदार

नरके करवीर विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्हीही खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर त्यांच्यासोबत गेले. माजी आमदार राजेश क्षीरसागरही शिंदे गटात गेले. मात्र, नरके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती, पण मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात आल्यानंतर हळूच मागच्या दाराने हजेरी लावून स्वागत केले होते. आज केंद्रीय मंत्री अमित शाह हे पुण्याहून विमानाने कोल्हापुरात आले होते. विमानतळावर श्री. शाह यांच्या स्वागताला भाजप नेत्यांनी गर्दी केली होती, त्यात नरके यांचीही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. शिवसेनेतील बंडाळीनंतर भूमिका स्पष्ट न केलेले नरके हे शाह यांच्या स्वागताला उपस्थित राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.