अजित पवार यांनी वर्तवले शिंदे- फडणवीस सरकारचे भविष्य..
राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारचे भविष्यही वर्तवले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार. याचा अंदाज वर्तवत त्यांनी तारीखही जाहीर केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे.
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पाहून सरकार 14 मार्चला कोसळणार असल्याचे भाकीत अजित पवार यांनी वर्तवले आहे. राज्य कर्जबाजारी पणाकडे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे सरकार अल्पकाळ रहाणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचा संदर्भ देत 14 मार्चला सरकार कोसळणार असल्याचा अंदाज आल्यानेच या अर्थसंकल्पात फक्त घोषणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांनी सरकारचे भविष्यच वर्तवले आहे.सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असल्याने लवकरच अजित पवार यांनी केलेला दावा खरा होतो का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांनी फडणवीसांना करून दिली 7 वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण
2015 साली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवलीसाठी तब्बल 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यावर अजित पवारांनी टोला लगावला आहे. कल्याण-डोंबिवलीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेसहा हजार कोटींची घोषणा केली होती. त्यातली एक दमडीही आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्याचप्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना शेतपंपाच्या वीजमाफीची घोषणा त्यांनीच केली होती. पण त्याचा साधा उल्लेखही नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
फडणवीसांनी तेव्हा कल्याण-डोंबिवलीसाठी 6500 कोटींची घोषणा केली होती. त्यामध्ये कचऱ्यापासून वीज, खत, सांडपाण्याचा पुनर्वापर, अतिक्रमणे रोखण्यासाठी उपग्रह दूरस्थ प्रणालीचा वापर, झोपडीधारकांना घरे, नागरी सुविधा, मानीव अभिहस्तांतरणाचे प्रश्न, 'अॅप'च्या माध्यमातून नागरी सेवा देऊन शहर सेवा-सुविधांनी परिपूर्ण केले जाईल. या सुविधा देताना लोकांवर कोणत्याही प्रकारचा कराचा बोजा टाकला जाणार नाही.
27 गावांमध्ये विकास केंद्र विकसित करून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण केला जाणार आहे. या सर्व सुविधांसाठी 6 हजार 500 कोटींच्या निधी देण्यात येणार आहे. या निधीतील एक पैसा कोठे मुरणार नाही. प्रत्येक पैशाचा जनतेला हिशेब दिला जाईल. इच्छाशक्तीची कमतरता आड येऊ न देता, येत्या पाच वर्षांत कल्याण डोंबिवली 'स्मार्ट'बरोबर 'सेफ सिटी' केली जाईल. पाच वर्षांनंतर फक्त घोषणा करण्यासाठी नव्हे तर सुंदर नगरी केली म्हणून आपल्या टाळ्या घेण्यासाठी येईन, असे देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले होते. याच घोषणेची आठवण अजित पवारांनी आज फडणवीसांना करून दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
