Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल - जयंतराव पाटील

खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल - जयंतराव पाटील 


मुंबई: अर्थमंत्र्यांनी आज १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला, परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटींच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटींवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते. अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे आज दर्शन झाले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले, "खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल’ असं मला वाटत नाही. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे." असेही ते म्हणाले आहे.

पुन्हा आपल्याला अर्थसंकल्प मांडायचा नाही हा एकमेव मांडायचा आहे या आविर्भावात देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मोठमोठ्या घोषणा आणि जे सात-आठ महिन्यात समोर आले ते सगळे एकत्रित करून जाहीर करण्याचे काम अर्थसंकल्पात करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

या वर्षभरात शिंदे-फडणवीस सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही याची खात्री असल्यासारखा हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. न्यायालयाचा निर्णय यायचा आहे आणि परवा झालेल्या निवडणुकीचा बराच मोठा धसका घेतलेला दिसतोय म्हणून जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट करून सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

आर्थिक पाहणी अहवालात आपल्या राज्याचे उत्पन्न, विकासदर हा मागच्या आठ महिन्यात कमी झालेला आहे. चालू अर्थसंकल्पातदेखील सरकार वेळेवर पैसे खर्च करत नाही. असे असताना सरकारने आज मोठ्या घोषणा केल्या व या करताना सर्व क्षेत्रांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आविर्भाव असा होता की, या महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय द्यायचा. तो न्याय वर्षभर करायचा असतो परंतु तो वर्षभराचा वेळ आपल्याला मिळणार नाही याची खात्री मनात ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

बांधकाम खात्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या मात्र महाविकास आघाडी सरकारने जेवढा (१५,६७३) निधी दिला त्याऐवजी १४, २२६ कोटी म्हणजे १४४९ कोटीने निधी कमी देण्यात आला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पात पाचवे अमृत पर्यावरणाचे होते. त्या पर्यावरणाला आघाडी सरकारने जो निधी दिला होता त्यापेक्षा २९ कोटी रुपये कमी दिला आहे. ऊर्जाक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या पण अतिशय जुजबी म्हणजे ९०० कोटींची वाढ दिसते हा तिसरा विरोधाभास आहे.

यामध्ये ९, ९२६ कोटींऐवजी १०, ९१९ कोटींची वाढ आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ५ लाखाचा खर्च सरकार करणार अशी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भरीव वाढ झाली असेल असे वाटले. परंतु २२-२३ आणि २३-२४ च्या अर्थसंकल्पात फक्त ३३७ कोटींचा फरक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, येरे येरे पावसा… तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा… घोषणांचा पाऊस आला मोठा, असा गाण्याचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी मिश्किल टोलाही लगावला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.