Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यात धक्कादायक प्रकार; आठवीत शिकणाऱ्या मुलीची साडेतीन हजारात विक्री, लॉजवर नेऊन केला बलात्कार

साताऱ्यात धक्कादायक प्रकार; आठवीत शिकणाऱ्या मुलीची साडेतीन हजारात विक्री, लॉजवर नेऊन केला बलात्कार 


सातारा : ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहराला हादरून सोडणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजारांत विक्री करून एका महिलेने तिला अनोळखीच्या हवाली केले. या नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लाॅजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार तब्बल नऊ दिवसांनंतर उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित महिला व अनोळखी पुरुषावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, सातारा) या महिलेस एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १३ वर्षांची असून, ती आठवी इयत्तेत शिकत आहे. भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला २८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता 'बाहेरचे लोक येतायत. त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे,' असे सांगितले. त्यामुळे मुलगी तिच्यासोबत फिरण्यासाठी गेली. त्यानंतर भारतीने तिला थेट साताऱ्यातील एका लाॅजवर नेले. या ठिकाणी अगोदरच तेथे एक अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत भारतीने व्यवहार ठरविला. त्या व्यक्तीकडून साडेतीन हजार रुपये घेऊन तिने मुलीची विक्री केली. 

त्याच्या ताब्यात मुलीला देऊन भारती तेथून निघून गेली. संबंधित नराधमाने त्या शाळकरी मुलीवर लाॅजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागली. तेव्हा तिला दमदाटी करण्यात आली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आईला मेसेज करून सांगितली. त्यावेळी तिची आई बाहेरगावी होती. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला. तेव्हा मुलगी रडू लागली. घडलेला घृणास्पद प्रकार मुलीने रडत-रडतच तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तातडीने साताऱ्यात येऊन तिच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली.

मात्र, या प्रकाराची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम ३७२, ३७६, ३२३, ३४ आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपिनरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत. 

सीसीटीव्हीत 'त्याचा' चेहरा कैद

साताऱ्यासारख्या शांत शहरात अशा प्रकारची घृणास्पद घटना घडल्याने पोलिसांनीही याची तातडीने दखल घेतली. गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके विविध ठिकाणी रवाना केली. लाॅजमधील सीसीटीव्हीमध्ये संबंधित आरोपी नराधमाचा चेहरा कैद झाला असून, तो आणि भारती दोघेही पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.