Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक; सांगलीत नीट परीक्षा दरम्यान उमेदवारांना अंतर्वस्त्रे उलटे करून घालायला लावले

 धक्कादायक;  सांगलीत नीट परीक्षा दरम्यान उमेदवारांना अंतर्वस्त्रे उलटे करून घालायला लावले


सांगली : देशात नुकतीच नीट ची परीक्षा पार पडली. यावेळी अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. मात्र या सगळ्यात सांगलीत एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले. अशी तक्रार उमेदवारांनी पालकांकडे केली. त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकारासंबंधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे.

देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. या परीक्षा पार पडत असताना सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थिनींचे तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे. परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व प्रकारची दाखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. याविषयी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना,” सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत. तक्रार दाखल झाल्याने सांगली मधील प्रकार समोर आला आहे. मात्र ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.” असे म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.