चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका परिचारीकेचा डांबरी रस्त्यावर डोके आपटून तिचा जागीच मृत्यू.
जत : बसर्गी ते बिळूर दरम्यान एका चारचाकी गाडी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका परिचारीकेचा डांबरी रस्त्यावर डोके आपटून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. रुपाली तानाजी जाधव-सुर्वे (वय ३५, रा. दुधाळ वस्ती, जत) असे मृत्यू झालेल्या परिचारिकेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदरची घटना जत पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रुपाली जाधव या बसर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका पदावर काम करत होत्या. नियमितपणे कामावरून परत येताना एका महिंद्रा कमांडर गाडीतून जतकडे येत होत्या. गाडी बसरगी पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आली असता चालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यांनाच तोल गेला त्या रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.दरम्यान, गाडी चालकाने त्यांना इतर प्रवाशांच्या मदतीने बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जत येथे खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्या मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी त्यांना ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.