गुगवाड येथील जवानाचा अपघातात मृत्यू
जत : पुण्याजवळ अपघात झालेल्या गुगवाड येथील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरुण साबू गुरव (वय 30, रा. गुगवाड, ता. जत) असे मृत जवानाचे नाव असून बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी व गुरव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अरुण गुरव हे जत तालुक्यातील गुगवाड येथील रहिवाशी आहेत. ते पश्चिम बंगाल येथे आपले कर्तव्य बजावत होते. त्यांची पत्नी प्रस्तुतीसाठी आपल्या माहेरी कर्नाटकातील निपाणी येथे होती. मुलगा झाल्याने तिला पाहण्यासाठी गुरव हे दीड महिन्याच्या रजेवर आले होते. मुलाला पाहून दोन दिवसांपूर्वी ते पश्चिम बंगाल येथे कामावर हजर होण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, पुण्याजवळ त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्यावर खडकी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा गुगवाडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सैन्य दलात ऑर्डनरी शिपाई पदावर कार्यरत होते. गेली अकरा वर्ष आपली सेवा बजावत होते. या घटनेने गुरव कुटुंबीयांवर व गुगवाड गावावर शोककळा पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.