जंतर-मंतरवर ' मिड नाईट ड्रामा '; पोलिसांकडून जीव घेणा हल्ला झाल्याचा कुस्तीपटूचा आरोप
दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. बुधवारी (3 मे) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. कुस्तीपटूंचा आरोप आहे की, पावसामुळे त्यांनी बेड्स मागवले होते, जे पोलिसांनी आणण्यापासून रोखले. स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच, कुस्तीपटू विनेश फोगट एका व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिनं घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांचंही वक्तव्य समोर आलं आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटला अश्रू अनावर, घडल्या प्रकारासंदर्भात बोलताना अनेक गंभीर आरोप
विनेश फोगाटची पोलीस आयुक्तांकडे तक्रार महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याचं विनेश फोगाटचं या पत्रात म्हटलं आहे. विनेशनं पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी जंतरमंतरवरुन निघून जाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनाही धमकावल्याचं म्हटलं आहे. विनेशनं वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप केला असून सर्व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
बजरंग पुनियानं गृहमंत्र्यांना लिहिलं पत्र
कुस्तीपटू बजरंग पुनिया यानंही गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. बजरंग पुनियानं गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चार मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही बजरंग पुनियानं गृहमंत्र्यांकडे केली आहे. कुस्तीपटूंचं असंही म्हणणं आहे की, मारायचं असेल तर असे मारा. बृजभूषणसारखे लोक उघड्यावर फिरत आहेत. कुस्तीपटूंनी सर्वांना जंतरमंतरवर एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी या घटनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानं केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
दिल्ली पोलिसांचे म्हणणं काय?
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचं वर्णन किरकोळ वाद म्हणून केलं आहे. डीसीपी प्रणव तायल म्हणाले की, "जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान, आप नेते सोमनाथ भारती परवानगीशिवाय फोल्डिंग बेड घेऊन आंदोलनस्थळी आले. आम्ही मध्यस्थी केल्यावर आंदोलन करणारे कुस्तीपटू आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रकमधील बेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर किरकोळ बाचाबाची झाली आणि सोमनाथ भारती यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आलं."
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "काही लोकांनी निषेधाच्या ठिकाणी फोल्डिंग बेड्स आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता ते आक्रमक झाले आणि आंदोलकांनंही त्यांना पाठिंबा दिला. त्यानं एका पोलीस कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीनं थांबवले आणि त्याच्यावर दारू प्यायल्याचाही आरोप केला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. एकाही आंदोलकाला मारहाण झालेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.