Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बिपरजॉय' वादळी वाऱ्याचा मुंबईला दणका; 6 जखमी 50 ठिकाणी झाडे जमीनदोस्त

'बिपरजॉय' वादळी वाऱ्याचा मुंबईला दणका; 6 जखमी 50 ठिकाणी झाडे जमीनदोस्त 


'बिपरजॉय' मुंबईपासून दूर गेल्याने सद्यस्थितीत मुंबईला दिलासा मिळाला असला तरी चक्रीवादळामुळे ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. उद्यादेखील अशीच स्थिती राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे मुंबईत 50 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एकूण सहा जण जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला 'बिपरजॉय' वादळाचा जोरदार फटका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र सुदैवाने वादळाची दिशा बदलल्याने मुंबईत जोरदार वारे आणि काही ठिकाणी झालेला पाऊस वगळता मोठा फटका बसला नाही. मात्र चक्रीवादळाच्या स्थितीमुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत होता. शिवाय जोरदार वाऱ्यांमुळे प्रचंड मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोट उडण्याचे प्रकार सुरू आहेत. ही स्थिती उद्याचा दिवस कायम राहील असा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी व्यक्त केला. यामुळे काळजी करण्याचे कारण नसले तरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 'बिपरजॉय'च्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून आवश्यक तयारी तैनात ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गोबा, भूविज्ञान सचिव एम. रविचंद्रन, कमल किशोर, सदस्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्हय़ात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

अशी झाली पडझड

मुंबई शहर विभागात 13, पूर्व उपनगरात 8 आणि पश्चिम उपनगरात 27 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये वर्सोवा अंधेरी येथे झाड अंगावर कोसळल्याने रोहन बार्ला (17) हा जखमी झाल्याची घटना घडली. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

तर दहिसर पूर्व येथे मुरबाली तलाव येथे झाड अंगावर कोसळून निशा मिस्त्री (44) या जखमी झाल्या. त्यांच्यावर मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुंबई शहर भागात 3, पश्चिम उपनगरात 3 ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये जुहू-वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या, तर वांद्रे पश्चिम दया उमर्षी चाळ येथे घरावरील पत्रा पडून एक जण जखमी झाल्याची घटना घडली, तर संपूर्ण मुंबईत 15 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.