मोठी बातमी! रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणी
सांगली : सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिलायन्स ज्वेल्समधील दरोड्यानंतर 10 दिवस होऊनही पोलिस संशयितांना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. खरे तर हा दरोडा व्यवस्थित प्लॅन करून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरोड्यात वजीराने बुद्धिबळाची चाल खेळली आहे. आंध्र प्रदेशातील प्यादी पुढे करून महाराष्ट्रातील मोहरा त्यांनी अचूक टिपला. या प्यादी आणि मोहऱ्याला पुढे करून बिहारच्या वजीराने मोठा डाव साधला आहे.
पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, ओडिशा नंतर या टोळीने महाराष्ट्रातील सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सची चोरीसाठी निवड केली. या टोळीचा गॉडफादर अगदी बारीकसारीक गोष्टींचा प्लॅन करत होता. त्याचा एक साथीदार बिहारच्या जेलमधून बाहेर पडल्यानंतर थेट आंध्रप्रदेशमधील हैद्राबाद येथे पोहोचला. तेथील काहींना हाताशी धरून महाराष्ट्रातील घरच्यांनी बेदखल केलेल्या 'गणपती'ची ओळख वाढवली. नंतर तो आंध्र प्रदेशातील दोघांसमवेत त्या गुळाच्या गणपतीला घेऊन सांगलीत आला.
सांगलीत तो गुळाचा गणपती त्याची कागदपत्रे वापरून एका हॉटेलमध्ये राहिला. त्याच्यासोबत आंध्रमधील ती प्यादी होतीच. बिहारच्या वजीराचा हस्तक गणपतीसह त्या प्याद्यांना हाताळत होता. सांगलीत राहण्याचा, खाण्याचा खर्च एका विशिष्ट यूपीआय क्रमांकावरून केला जात होता. याचे त्या गणपतीला काहीच विशेष वाटले नाही. घरच्यांनी बेदखल केल्याने ऐश करायला मिळते म्हणून तो जिथे तिथे त्याची ओळख स्पष्ट करत गेला.
दरम्यान यातील वजीर सर्व सूत्रे हलवत असताना त्याचे हस्तक सांगली जिल्ह्याजवळ असलेल्या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांनी गणपती, ती प्यादी यांना न कळता सांगलीत रेकीही सुरू केली होती. पण याचा थांगपत्ता ना त्या गणपतीला होता ना प्याद्यांना. रेकी पूर्ण झाल्यावर प्यादी परत घरी पाठवण्यात आली. यात विशेष असे की वजीराचा हस्तक आणि त्या प्याद्यांनी मोबाईलचा वापरच केला नाही. यावेळी त्यांनी फक्त मोहरा असलेल्या गणपतीचाच सर्वत्र वापर केला.
काम पूर्ण होईपर्यंत मोहरा वजीराच्या हस्तकांसोबत होता. घटना घडल्यानंतर मोहऱ्याचे नाव पुढे आले. नंतर पोलिसांनी तपासात त्याच्याशी संबंधित नातेवाईक आणि आंध्रमधील त्या मोहऱ्याना आणून चौकशी केली. त्यातून ठोस माहिती पोलिसांना मिळाली आहे. पण वजीर आणि यात सहभागी असणारे त्याचे हस्तक यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान सांगली पोलिसांसमोर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.