जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखा, अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका- प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
सांगली दि. 9: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत सोशल मिडीयावर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे स्टेट्स प्रसारित केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नागरीकांनी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज, फोटो, व्हिडीओ, कमेंट सोशल मिडीयावर शेअर अथवा पोस्ट करू नयेत. जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडवल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवून जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
समाज माध्यमांवरील मेसेज, फोटो, व्हिडीओ, कमेंटवर सायबर सेलचे विशेष पथक, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्या अथवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मिडियाच्या माध्यमांतून धार्मिक व जातीय भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेट्स, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एस.एम.एस. तयार करून प्रसारित करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सामाजिक शांतता खराब करून, अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवून, त्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.