गणेशोत्सव, नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ; पोलीस अधीक्षक बसवराज तेली
सागंली : गणेशोत्सव, नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीसा बजावण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीआरपीसी १०७, ११० आणि १४४ कलमाअंतर्गत कारवाई केली जात आहे. त्यासोबतच १४९ च्या नोटीसदेखील गणेशोत्सव मंडळांना दिल्या जात आहेत. १४९ च्या नोटीसासह सुमारे ६ हजार जणांवर या गणेशोत्सव काळासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सांगली पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
आत्तापर्यंत काहीजणांना तडीपारीच्या नोटीसादेखील बजावण्यात आल्या आहेत. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायद हत्यार बाळगणे, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची यादी तयार करण्यात आली आहे. या गुंडावरदेखील गणेशोत्सव काळात कारवाई करण्यात येत आहे. पुढील आठवड्यामध्ये ही कारवाईची प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.
पोलीस दप्तरी नाव असणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण असले पाहिजे यासाठी ही प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.