Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं, रोहित पवार यांचा सर्वात मोठा आरोप

अजितदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं, रोहित पवार यांचा सर्वात मोठा आरोप

अहमदनगर : (शरद पवार) साहेबांनी (अजित) दादांवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही, पण त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

अहमदनगरमध्ये बोलताना त्यांना अजित पवार यांना खडेबोल सुनावले. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी तेथील जनतेला भावनिक आवाहन केले. बारामतीमध्ये एकटं पाडलं जातंय असं विधान त्यांनी केलं होतं. त्याच विधानाचा समाचार घेताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

दादांनीच कुटुंबाला एकटं पाडलं

योगेंद्र पवार यांनी जी भूमिका घेतली ती( शद पवार) साहेबांच्या बाजूची घेतली. कारण आम्हा सर्वांना माहिती आहे दादावर साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं. जी जी मोठी संधी समोर आली ती कुटुंबातील इतर कोणालाही मिळाली नाही, तर दादांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही. उलट अजित पवार यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला. आणि ते त्यांच्यासोबत (भाजप) गेले. अजित पवारांनी कुटुंबाला एकट पाडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो कुटुंबाला आवडला नाही. जय आणि योगेंद्र पवार देखील बोलले की दादांना एकटं पाडलं नाही. मग आता दादा असं का म्हणत आहेत की त्यांना एकटं पाडलं ? अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.


काय म्हणाले होते अजित पवार ?

अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार भावनावश झाले. ते म्हणाले, " बारामतीमध्ये आता ते एकमेव वरिष्ठ आहे. दुसरे वरिष्ठ पुणे शहरात आहेत. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे. काही जण तुम्हाला भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील. परंतु भावनेने काम होत नाही. प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही. त्यासाठी तडफ लागते." असं अजित पवार म्हणाले होते.


मशाल हातात घेऊन तुतारी वाजवायची

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते. यामधील शरद पवार गटाला 'तुतारी' हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलं. त्यावरही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. लवकरात लवकर चिन्ह मिळायची आमची अपेक्षा होती. घड्याळात चिन्ह आणि पक्ष राहो असा सर्वांचा प्रयत्न होता. मात्र भाजपची ताकद संविधानाच्या पलीकडे जायला लागली असे दुर्दैवाने वाटतं . निवडणूक आयोगाचा वापर करून पक्ष दुसऱ्याच्या हातात दिला. नवीन नाव आणि चिन्ह मिळू नये यासाठी अजित पवार गटाने विरोध केला होता. पण आता तुतारी हे चिन्ह मिळालं आहे त्यामुळे मशाल हातात घेऊन तुतारी वाजवायची आहे. घड्याळाला नवीन वेळ मिळाला आहे. नवीन चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जायला अडचण नाही उलट लोकांना उत्सुकता आहे, असंही ते म्हणाले.

बारामती मतदारसंघात पुढच्या खासदार सुप्रिया सुळेच

बारामतीतील निवडणुकीबाबातही त्यांनी भाष्य केलं. बारामती मतदारसंघातील चुरस ही सामान्य लोक विरुद्ध शक्ती आणि अहंकार यांच्या विरोधात होईल. बारामतीचे व्हिडिओ आणि गाड्या आले आहेत त्यावरून वाटतं कुटुंबातीलच व्यक्ती निवडणूक लढेल. पण बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेच पुढच्या खासदार असतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.