Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बॉम्ब स्फोट,70 ठार तर 150 जण जखमी

मस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बॉम्ब स्फोट,70 ठार तर 150 जण जखमी 


रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी,22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला.

मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस  या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन  वहे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे.

15 ते 20 मिनिटं गोळीबार सुरू

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक आले होते. त्यावेळी अचानक सहा ते सात हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये 40 टक्के भाग जळून खाक झाला.

महत्त्वाचं म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना आम्ही रशियाला 7 मार्च रोजीच दिली होती असं अमेरिकेनं म्हटलंय. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेनं केला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर स्फोट झाला. टास वृत्तसंस्थेनुसार, आपत्कालीन सेवांनी सांगितले की, लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये हल्लेखोर दिसत आहेत

सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडीओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो. एका व्हिडीओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत. क्रोकस हॉलच्या छतावरून ज्वाळा उठताना दिसत आहेत.

50 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना

मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर 50 रुग्णवाहिका टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या.मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून 100 लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.

हल्ल्याची भीती अमेरिकेने आधीच व्यक्त केली होती

वृत्तसंस्था स्पुतनिकने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने क्रोकस हॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या काही दिवसांपूर्वी संभाव्य हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाने 7 मार्च रोजी त्यांच्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. दूतावास नजीकच्या भविष्यात मॉस्कोमध्ये अतिरेकी हल्ला करण्याचा विचार करत असल्याच्या अहवालांवर लक्ष ठेवत आहे आणि अमेरिकन नागरिकांनी पुढील 48 तास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं अमेरिकेनं त्याच्या निवेदनात म्हटले होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.