Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'चंद्रहार'च्या हाती ठाकरेंची मशाल, विशाल पाटलांना गाठले खिंडित, नाराजी उफाळणार...

'चंद्रहार'च्या हाती ठाकरेंची मशाल, विशाल पाटलांना गाठले खिंडित, नाराजी उफाळणार...

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सरु असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेत आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा सेनेला जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली. काँग्रेसच्या हक्काची 'सांगली'ची जागा शिवसेना हिसकाहून घेण्याचा प्रयत्न करीत विशाल पाटलांना खिंडित गाठले आहे. जर जागा सेनेला गेलीच तर जिल्ह्यात काँग्रेस-शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे चंद्रहार यांना लोकसभेचे मैदान मारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे चित्र दिसून येते.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सामाजिक कामांद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्यानंतर अनेक पक्षांकडे त्यांनी चाचपणी केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट) द्यावा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवले होते. तेथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर काँग्रेसने सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर चंद्रहार यांचा सेना प्रवेश लांबणीवर पडला होता. अखेर चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. ते मुंबईत सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करतील. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

चंद्रहार यांनी 2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला होता. या काळात त्यांच्याकडून विकासकामे करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर राजकारणापासून दूर राहिले. गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्यक्रम हाती घेतल्याने ते पुन्हा चर्चेत आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. रक्तदान शिबीर, बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधला होता. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीतून उमेदवारी जाहीर करु, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याने मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला.

'सांगली' हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. गतवेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसचे विशाल पाटील यांना राजू शेट्टींच्या स्वाभिमानीकडून लढावे लागले. यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. गतवेळी झालेल्या पराभव विसरुन अनेक कार्यक्रमांद्वारे वातावरण निर्मिती केली आहे. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडणार असल्याचे अटळ आहे.

सांगलीत विजयाची खात्री असताना ती का पणाला लावत आहात? असा सवाल जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे उपस्थित केला होता, त्यानंतरही राज्यस्तरावर प्रश्न सुटला नाही. आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी सांगलीची चिंता करु नये, असे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसलाच जागा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जर जागा गेलीच तर आयात करून घेतलेला उमेदवार या मतदारसंघात लोक स्वीकारणार नाहीत, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

नाराज काँग्रेस जाणार विरोधात

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जर ही जागा शिवसेनेला (उबाठा) ला सोडली तर 2009 मध्ये जत विधानसभा मतदारसंघात जो पॅटर्न राबवला होता, तोच पॅटर्न काँग्रेस विसर्जित करून राबवू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला आहे. सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सांगली मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. मतदारसंघ काँग्रेसकडून सुटणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात नाराजी वाढत चालली आहे.

ठाकरे गटाची मुळात ताकद कमी

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा समावेश आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी आहे. ठाकरे गटाचे खानापूर-आटपाडीतून स्वर्गीय अनिल बाबर हे एकमेव आमदार होते. त्यांची मतदारसंघात ताकद होती. परंतु सेनेतील बंडानंतर बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्ह्यात सेनेला ताकद वाढविता आलेली नाही. विशाल पाटलांना डावलल्यास नाराज काँग्रेस चंद्रहार पाटलांना किती मदत करणार याबाबतचा प्रश्न आहे.

जयंत पाटलांचा संजयकाकांशी सलोखा

अजित पवार  यांच्या बंडानंतर आमदार जयंत पाटील  यांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील पंधराहून अधिक माजी नगरसेवकांनी अजितदादा गटात प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातही म्हणावी तशी ताकद राहिलेली नाही. याशिवाय जयंत पाटील यांचे भाजपचे संजयकाका पाटील  यांच्याशी सलोखा आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत जयंतरावांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजयकाकांना मदत केली होती. महाविकास आघाडीकडून चंद्रहार यांची उमेदवारी निश्चित झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रहार यांच्यासाठी लोकसभेचे मैदान सोपे नसल्याचे स्पष्ट आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.