Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंच्या आक्रमक पणा मुळे काँग्रेस अस्वस्थ!

उद्धव ठाकरेंच्या आक्रमक पणा मुळे काँग्रेस अस्वस्थ!

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांवर बैठक सुरु आहेत. मात्र अद्याप जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती मिळत आहे. ४-५ जागांवर पेच कायम आहे. एकीकडे ही स्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या आक्रमकपणामुळे काँग्रेस अस्वस्थ झाल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नसताना उद्धव ठाकरे सभा घेत उमेदवार जाहीर करत आहेत. त्यात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा देखील केली.

वरळीमध्ये शनिवारी वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना फोन करून मतदारसंघ निश्चित झाल्याचं सांगत तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. मात्र काँग्रेस देखील सांगलीची जागा आपल्याला मिळावी यावर ठाम आहे. काँग्रेस विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहे. 

नाना पटोले यांनी देखील काल जाहीर केलं होतं की विशाल पाटील हे आमचे सांगलीचे उमेदवार असणार आहेत. याबाबत 1 ते 2 दिवसात आमची उमेदवाराची यादी जाहीर होईल. ठाकरे गटाने रामटेक जागा काँग्रेसला सोडून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला आहे, अशी देखील चर्चा आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला?

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपाचे दोन फॉर्म्युले ठरवले आहेत. ज्यामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास आणि सोबत न आल्यास असा विचार करुन हे फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.

ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ९ आणि वंचित ४ जागा असा फॉर्म्युला असणार आहे. तर वंचित महाविकास आघाडीसोबत न आल्यास २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.