Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत गडचिरोलीत चार नक्षल्यांचा खात्मा

पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत गडचिरोलीत चार नक्षल्यांचा खात्मा

गडचिरोलीमधून मोठी बातमी समोर येत असून, पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची विश्वसनीय माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती.

त्यामुळे पोलिसांच्या सी-60 पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच, एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे नक्षलवाद्यांना सी-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ज्यात चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथके अतिरिक्त ऑपरेशनचे एसपी यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात होता. 

दरम्यान, एसपीएस रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का पर्वतांमध्ये आज पहाटे शोध घेत असताना सी-60 पथकाचा समावेश असलेल्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांना सी-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे.

मृतदेह सापडलेल्या नक्षलवाद्यांची नावं..

डीव्हीसीएम वर्गेश, (मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचे सचिव आणि कुमुराम भीम मंचेरियल विभागीय समितीचे सदस्य)

डीव्हीसीएम मागटू, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव

कुरसंग राजू, पलटन सदस्य

कुडिमेट्टा व्यंकटेश,पलटन सदस्य


पथकाला 36 लाखांचे रोख बक्षीस

गडचिरोली पोलिसांना आज मोठं यश आले असून, चार नक्षल्यांचा खातमा करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पथकाला महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले 36 लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर देखील परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, सी-60 कमांडो पथक देखील परिसरात गस्त घालत असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील नक्षल समर्थक 36 संघटनांची पोलिसांनी ओळख पटवली...

मागील काही दिवसांत नक्षली पुन्हा एकदा अधिकचे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात शहरी नक्षलवादाचा मुद्दा समोर आला असून, राज्यातील महत्वाच्या शहरातील झोपडपट्टीमधील तरुणांचे मनपरिवर्तन करून त्यांना नक्षली कारवायात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या रडावर शहरी नक्षलवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, नक्षल समर्थक असलेल्या राज्यातील 36 संघटनांची पोलिसांकडून ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.