एसटीचा भीषण अपघात; ट्रक आणि बसच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू
नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात हा अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी हे जखमी झाले आहेत. या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस दाखल झाले आणि मदत-बचावकार्य सुरू झाले. अपघातात जखमी असलेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही एसटी बस जळगाव येथून नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी चांदवड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.
हा अपघात झाल्याने मुंबई - आग्रा महामार्गावर काहीकाळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मिळून मदत आणि बचावकार्य सुरू केले. तसेच पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काम सुरू केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.