सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकली (ता. मिरज) येथे उभारलेल्या पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तब्बल १४ लाखांचा गुटखा तसेच त्याची वाहतूक करणारी पिकअप जीप असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एकजण पसार झाल्याची माहिती सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली.
असलम सलीम मुजावर (वय ३५, रा. विनायकनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे तर इरशाद मुलाणी (रा. ख्वाजा कॉलनी, सांगली) असे पसार झालेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैसे, दारू, गुटखा यासह अन्य अंमली पदार्थाची वाहतूक रोखण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी तपासणी नाके उभे केले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांचा अंकली येथे तपासणी नाका आहे.
शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिरजेहून अंकली फाटामार्गे एक पिकअप जीप (एमएच ५० ७४२९) सांगलीकडे निघाली होती. तपासणी नाक्यावरील पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने ती गाडी अडवण्यात आली. गाडीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये भरलेला विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला. याबाबत गाडीचा चालक मुजावर याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा माल सांगलीतील इरशाद मुलाणी याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मुजावर याला अटक करून मुद्देमाल जप्त केला. त्याला दि. १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक प्रियांका बाबर, नितीन बाबर, इस्माईल तांबोळी, रमेश पाटील, हिम्मत शेख, सतीश सातपुते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.