"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत. तरी देखील भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातील सगळे मोठे निर्णय तावडे घेत आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय वजन कमी होत असून फडणवीस व त्यांचे नेते घाबरले आहेत.'' अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी रविवारी फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार पवार यांच्या उपस्थितीत "महिला महाराष्ट्र प्रिमीयर लिग'ची रविवारी घोषणा करण्यात आली.
यावेळी पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उद्योजक प्रवीण माने यांनी प्रवेशाची घोषणा केली. त्याविषयी पवार म्हणाले, ""प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. माने मनातून गेले आहेत, की त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध नेले आहे हे बघावे लागेल. नेते गेले तरीही, जनता आमच्यासोबत आहे. सुप्रिया सुळे तीन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील.''पवार म्हणाले, ""काही लोकांकडून महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखरण्याचे काम सुरु आहे, त्या लोकांचे काय ? लवकरच तिसरी फाइल उघडू, त्यातही मोठे घोटाळे आहेत. विरोधकांकडे आता पैसे खूप झाले आहेत. त्यांना २०० कोटी रुपयांचा मलिदा मिळाला असल्यामुळेच ते बेजबाबदार विधाने करत आहेत.''
केजरीवाल यांच्याप्रमाणे ते खडसेंनाही जेलमध्ये टाकतील !
"एकनाथ खडसे यांच्या खूप अडचणी आहेत. भाजप खोट्या फाइल काढून कारवाई करू शकते, भाजपने खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. सध्या खडसे यांची तब्येत खराब असून अशा परिस्थितीत ही भाजप त्यांना जेलमध्ये टाकू शकते. भाजपने खडसे यांना ब्लॅकमेल केले असावे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या फाइल काढून जेलमध्ये टाकले, तसाच प्लॅन खडसे यांच्याबद्दलही त्यांनी केला असेल.'' अशा शब्दात पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
..तर पुण्यातही "आयपीएल' होईल !
"आयपीएल'मध्ये पुण्याचा क्रिकेट संघ नाही, त्यामुळे "आयपीएल'चे सामने पुण्यात होत नाहीत. पण अनेक राज्यात सध्या पाण्याचा अभाव आहे, तिकडे क्रिकेट सामने होतील की नाही माहिती नाही. मात्र आम्ही पुण्यात क्रिकेट सामने घेण्यासाठी विनंती केली आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने होण्याची शक्यता आहे, असेही पवार यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.