Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुनातील संशयितास बारा तासाच्या आत अटक सांगलीवाडी खून प्रकरण, पूर्ववैमनस्यातून केला होता हल्ला

खुनातील संशयितास बारा तासाच्या आत अटक सांगलीवाडी खून प्रकरण, पूर्ववैमनस्यातून केला होता हल्ला


सांगली :  सांगलीवाडी येथे पूर्ववैमनस्यातून एका तरूणाला मध्यरात्री घरातून बाहेर बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणातील संशयिताला बारा तासाच्या आत अटक करण्यात आले. हारूगडे प्लॉट परिसरात ही घटना घडली होती. यावेळी संशयिताने मृताच्या वडिलांवरही हल्ला केला होता. कृष्णा नदी काठाला लपून बसलेल्या संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 


(मयत प्रतीक )
किशोर नामदेवराव कदम (४३ रा. हारूगडे प्लॉट, सांगलीवाडी) असे संशयिताचे नाव आहे. प्रतिक भिमराव गायकवाड (वय २१, रा. हारूगडे प्लॉट) असे मृत तरूणाचे नाव आहे तर या हल्ल्यात भिमराव गायकवाडही जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रमिला भिमराव गायकवाड (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री प्रतिक जेवण करून घरात बोलत बसला होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास संशयित किशोर कदम याने त्याला काम असल्याचे सांगत घरातून बाहेर बोलावले. 

प्रतिक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या प्रतिकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातील तसेच शेजारचे लोक धावत तेथे आले. त्यावेळी प्रतिकचे वडील भिमराव यांनी त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित कदम याने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी केले. नंतर किशोर तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी संशयित किशोर कदम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असताना तो कृष्णा नदी काठावर लपून बसल्याची माहिती संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार यांना खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.  सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, प्रमोद खाडे, महादेव पोवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.