Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?

भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातून भाजपा बिनविरोध निवडून आली आहे. तर, या जागेवरील काँग्रेस उमेदवार ७२ तासांपासून बेपत्ता आहे. सुरत लोकसभेची जागा भाजपाच्या मुकेश दलाल यांनी बिनविरोध जिंकल्यापासून, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, ते कुठे आहेत याची त्यांच्या पक्षालादेखील कल्पना नाही. भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल निवडून आल्याची घोषणा झाल्यापासून कुंभानी यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. ते भाजपात सामील होतील असेही सांगण्यात येत आहे. कुंभानी यांच्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर बंडखोर असल्याची पोस्टर्स लावल्याचेदेखील आढळून आले आहे.

कोण आहेत नीलेश कुंभानी?

नीलेश कुंभानी पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान प्रसिद्ध झाले होते. यंदा त्यांना काँग्रेसकडून सुरत लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती. यापूर्वी कुंभानी यांनी महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविला होता. कुंभानी मूळचे अमरेली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सुरतमध्ये मोठा बांधकाम व्यवसाय उभा केला आहे. पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (PAAS) नेते हार्दिक पटेल यांच्याशी असणार्‍या जवळीकीमुळे ते राजकारणात सामील झाल्याचे बोलले जाते.

पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांच्यासह कुंभानी यांनी २०१५ मध्ये सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात पाटीदारांना कोटा मिळावा यासाठी भाजपा सरकारविरोधात केल्या गेलेल्या आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांनी अंदाजे सहा लाख लोकांना जमवून भव्य सुरत सभेचे आयोजन करण्यास मदत केली होती; ज्यामुळे राज्यातील भाजपा सरकारने या विषयाची दखल घेतली.

त्यानंतर पाटीदार अनामत आंदोलन समितीने डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या सुरत महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसशी करार केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केले. वराछा, पुनागाम, मोटा वराछा, कपोदरा, कतरगाम, नाना वराछा या पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये अनेकांनी विजय मिळवला. त्यात कुंभानी यांचाही समावेश होता. त्यांनी प्रभाग क्रमांक १७ येथून विजय मिळवीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला.

पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांनी सांगितले की, २०१७ ची विधानसभा निवडणूक कुंभानी यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढवायची होती. परंतु, काँग्रेसला ते मान्य नव्हते. काँग्रेसने भाजपाकडून पूर्वी पराभूत झालेल्या पाटीदार समाजातील अशोक जिरावाला यांना उमेदवारी दिली. २०२१ मध्ये (कोविड काळानंतर) सुरत महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तेव्हा कुंभानी यांनी पुन्हा निवडणूक लढवली; पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला.

काँग्रेसने सुरतमधून कुंभानी यांना उमेदवारी का दिली?

पक्षाने त्यांना उमेदवारी का दिली, यावर सुरत काँग्रेसचे अध्यक्ष धनसुख राजपूत म्हणाले की, “भाजपाने पाटीदाराला उमेदवारी दिली होती. सुरतमध्ये १८ लाख मतदारांपैकी ६.५० लाखांहून अधिक पाटीदार मतदार आहेत. आम्हाला नीलेश कुंभानी सक्षम वाटले. कारण- ते आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि त्यांच्या समाजात लोकप्रिय आहेत.”

कुंभानी यांनी लोकसभेच्या सुरत या जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज भरले. नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चार जणांपैकी तिघांनी त्यांच्या फॉर्मवर सह्या केल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणार्‍यांमध्ये त्यांचे मेहुणे जगदीश सावलिया, त्यांचे पुतणे ध्रुवीन धमेलिया व व्यवसायातील त्यांचे भागीदार रमेश पोलरा यांनी सह्या केल्या नाहीत.

उमेदवार बेपत्ता

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, कुंभानी यांचे कागदपत्र नाकारले गेल्यास आमच्याकडे पर्यायी उमेदवारदेखील होते. परंतु, कुंभानी यांच्याप्रमाणेच पर्यायी उमेदवार सुरेश पडसालादेखील बेपत्ता आहेत. काँग्रेस नेत्यांनीही ते बेपत्ता असल्याचे कबूल केले आहे. कुंभानीप्रमाणे पडसाला यांचाही अर्ज रद्द करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मतदान अधिकाऱ्यांना चारही प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले, “सुरतमध्ये नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चारही जणांच्या सह्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. हा योगायोग नाही. उमेदवार अनेक तास बेपत्ता आहेत.”

सुरत शहर काँग्रेसचे नेते व प्रवक्ते नौशाद देसाई यांनी सुचवले की, कुंभानी परत आल्यास पक्षाला अजूनही आशा आहे. भाजपाने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गैरफायदा घेतला आहे. सुरतमध्ये जे घडले, ती बाब म्हणजे लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “नीलेश कुंभानी सुरत निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात गेले आहेत आणि येत्या काळात ते याचिका दाखल करणार आहेत. जर त्यांनी असे काही केले नाही, तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.”


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.