लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रचाराला वापरण्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींचे दर निश्चित केले असून, या नियमांचे पालन उमेदवारांना काटेकोरपणे करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक खर्चाचा ताळेबंद ठेवताना कसरत करावी लागणार आहे.
95 लाखांत बसवावा लागणार प्रचार खर्च
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. यापूर्वी उमेदवाराला सुमारे 70 लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. यंदा मात्र त्यामध्ये वाढ करून ती 95 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या 95 लाखांत उमेदवारांना सर्व खर्च बसवावा लागणार आहे. त्यात यंदा निवडणूक प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाल्याने हा ताळेबंद ठेवणं उमेदवारांना थोडसं अवघड जाणार आहे.
चहा वडापावसाठी 25 रुपये
प्रचारादरम्यान उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांना चहा दिल्यास प्रतिचहा 20 रुपये आणि कॉफीसाठी 25 रुपये निवडणूक खर्चात जोडले जातील. नाश्त्यासाठी 30 रुपये आणि वडापावसाठी प्रतिव्यक्ती 25 रुपये खर्च करू शकतात. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचारासाठी लागणाऱ्या प्रचारसाहित्यांसह जाहिरातीपर्यंतच्या विविध गोष्टीचे दर निश्चित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाररथांचा वापर करतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने रथाचे भाडे दोन तासांसाठी 15,550 रुपये आणि तीन तासांसाठी 22 हजार रुपये असे निश्चित केले आहे.निवडणूक प्रचारादरम्यान मोठ मोठ्या प्रचार रॅली आणि प्रचार सभा होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. या खर्चावरदेखील निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यानुसार दरदेखील निश्चित करण्यात आले आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या 'एलईडी'साठी दिवसाला सहा हजार, तर पदयात्रेत लागणाऱ्या जीप रथाला 9,100 रुपये, तर व्हॅनिटी व्हॅनसाठी 25 हजार रुपये दर आहे. कापडी मंडपासाठी प्रतिचौरस फूट 30 रुपये, साध्या मंडपासाठी 18 रुपये प्रतिचौरस फूट असा दर आहे.खुर्च्यांसाठी प्रतिनगासाठी 10 रुपये, सतरंजीसाठी एक रुपये दर दिला आहे. लाकडी स्टेजसाठी प्रतिचौरस फूट तीस रुपये प्रतिदिन अशा पद्धतीने खर्च आकारला जाणार आहे. स्टार प्रचारकांच्या सहा फूट उंचीच्या स्टेजसाठी 70 रुपये दर आहे. सिंथेटिक कारपेट, टी पॉय, मोबाइल टॉयलेट, वॉटरप्रूफ मंडप, मॅट, सोफा सेट, व्हीआयपी सोफा सेट यांचाही दर ठरविण्यात आला आहे. व्हीआयपीच्या एका सोफा सेटसाठी प्रतिदिन 1200 रुपये दर ठरला आहे. चहा, मिनरल वॉटर, पाण्याचा जार, नारळ पाणी, थंड पेयांचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.
रिक्षाचा दर 1250
प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांचादेखील निवडणूक आयोगाने प्रचार खर्चामध्ये विचार केला आहे. त्यानुसार प्रचारासाठी रिक्षा, साउंड सिस्टिमसह दुचाकी, टाटा मॅजिक, टेम्पो ट्रॅव्हलर, 25 ते 50 प्रवासी क्षमतेच्या बसचे दर दिले आहेत. विविध प्रकारच्या प्रवासी वाहनांचा वापरामध्ये मर्सिडीजचा दर प्रति दिन 28 हजार रुपये निश्चित केला आहे. रिक्षाला बाराशे पन्नास इतका दर निश्चित करण्यात आला आहे. तर सर्वाधिक कमी दर दुचाकीचा असून, प्रतिदिन 500 रुपये दर आहे. एसयूव्ही, स्कॉर्पिओ, तवेरा यांच्यासाठी प्रत्येकी 5,125 रुपये, इनोव्हा, झायलोसाठी प्रत्येकी 5,888 रुपये, स्कोडा 5,200 रुपये आणि बीएमडब्ल्यूचा एका दिवसाचा दर 18,300 रुपये निश्चित केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.