अलिबाग : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अशी म्हण आहे. मात्र. ही म्हण स्वत:च्या स्वार्थासाठी एका आईने खोटी ठरवली. या आईने तिच्या अनैतिक संबंधांसाठी पोटच्या दोन चिमुरड्यांची हत्या केली. ही घटना ३१ मार्च रोजीची आहे. दोन्ही मुलांच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनंतर पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी गुप्त तपास केला आणि त्यातून हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शीतल सदानंद पोले आणि सदानंद नामदेव पोले हे दाम्पत्य किहिममधील दाजीबा पेटोले यांच्या वाडीत एक वर्षापासून काम करत आहेत. त्यांना आराध्या ( ५ वर्षे) आणि सार्थक (३ वर्षे) ही मुले होती. ३१ मार्च रोजी दुपारी जेवल्यानंतर आराध्या आणि सार्थक ही दोन्ही मुले झोपली ती पुन्हा उठलीच नाही. मुले न उठल्याने घाबरलेल्या आई शीतलने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री ८ वाजता दोन्ही मुले मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आणि पोल दाम्पत्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
दरम्यान, दोन मुलांचा अचानक मृत्यू झाल्याने पोलिसांनी १ एप्रिल रोजी दोन्ही पार्थिव पोस्ट मॉर्टेमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवले होते. तेव्हा या चिमुरड्यांचा मृत्यू नव्हे तर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पुढे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि हत्येचे खरे कारण समोर आले. त्यानंतर मांडवा पोलिसांनी काल (८ एप्रिल) आरोपी आईला ताब्यात घेतले. आपल्या विवाहबाह्य संबंधात मुले अडथळा ठरत असल्याने शीतल पोले (वय २५) हिने मुलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोले दाम्पत्याचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील पुसत तालुक्यामधील बेलोरा गाव आहे.
नक्की काय घडले?
शीतल पोले हिचे गावाकडील तरुणाशी विवाहबाह्य संबंध होते. तिला प्रियकरासोबत लग्न करायचे होते. पण त्याला ही दोन्ही मुले नको असल्याने तिच्या संबंधात मुलांचा मोठा अडथळा बनला होता. अशातच शीतलचे तिच्या प्रियकराशी वारंवार मोबाईलवर बोलणे व्हायचे आणि ते पाच वर्षांच्या आराध्याच्याही लक्षात आले होते. आई सतत कुणाशीतरी फोनवर बोलत असते, असे आराध्याने वडिलांना अनेकदा सांगितले होते. त्यामुळे मुलांना कसे दूर करायचे याचा शीतल विचार करत होती. अखेर घरात नवरा (सदानंद पोले) नसल्याचा फायदा घेत तिने ३१ मार्च रोजी दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर गमजा बांधला आणि हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला. त्यानंतर दुपारी जेवल्यानंतर दोन्ही मुले उठेलच नाहीत, असा संध्याकाळी कांगावा केला.पोस्ट मॉर्टेमनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचे पार्थिव पालकांकडे सुपूर्द केले. पोले दाम्पत्याने मुलांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी यवतमाळमधील पुसदला नेले. तेव्हा पोलिसांना प्रेमाचा एक धागा सापडला आणि कसून तपास केल्यानंतर ते चिमुकल्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. या अवघड हत्येचा तपास करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे एपीआय सोमनाथ लांडे, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीआय बी. बी. खाडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.