Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

600 कोटींची संपत्ती, लक्सरी हॉटेल्सचा मालक.. कोण आहे बिल्डर विशाल अग्रवाल?

600 कोटींची संपत्ती, लक्सरी हॉटेल्सचा मालक.. कोण आहे बिल्डर विशाल अग्रवाल?


पुण्यातील कार अपघाताच्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आज अल्पवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला  छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी  अटक केली आहे. विशाल अग्रवालने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता.मात्र पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्यानंतर आता अल्पवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात विशाल अग्रवाल कोण आहेत? 


संभाजीनगरमधून अटक 
विशाल अग्रवालने पोलिसांना चकमा देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला होता. पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी त्याने त्याची नेहमीची कार आणि ड्रायव्हर मुंबईच्या दिशेने पाठवली होती. आणि दुसरी कार दुसऱ्या चालकासह कोल्हापूर मार्गाने गोव्याने दिशेने रवाना केली होती. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये ते स्वतः मुंबईला गेल्याची माहिती दिली होती.

विशाल अग्रवालने स्वतःचा फोन बंद करून नवीन नंबर वापरायला सुरुवात केली होती. आणि तो त्याच्या मित्राच्या गाडीतून संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाला होता. पण संबंधित गाडीचा जीपीएसद्वारे शोध घेण्यात आला. यानंतर पुणे गुन्हे शाखेने पाठवलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटवली. आणि विशाल अग्रवाल याला अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. आता त्याला उद्या पुण्यातील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

600 कोटींची मालमत्ता 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या अनेक पिढ्या बांधकाम व्यवसायात आहेत. ब्रह्मा कॉर्प नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी सुरू केली होती. त्याचे वडील विशाल अग्रवाल आता या जवळपास 40 वर्ष जुन्या कंपनीचे मालक आहेत. ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी अनेक कंपन्या सुरू केल्या होत्या.त्यांच्या कंपन्या पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर भागात आहेत. त्यांनी अनेक मोठे गृहप्रकल्प देखील उभारले आहेत.

आरोपीच्या कुटुंबीयांकडे ब्रह्मा मल्टीस्पेस, ब्रह्मा मल्टीकॉन यासारख्या व्यावसायिक कंपन्या आहेत. त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने पुण्यात पंचतारांकित हॉटेल्सही बांधली आहेत. सध्या विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची एकूण संपत्ती सुमारे 601 कोटी रुपये आहे.

नेमकं प्रकरण काय?
पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे गाडी चालवणाऱ्या एका बिल्डरच्या पोराने दोन जणांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी आरोपी मुलाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर 15 तासांत त्याला जामीन देण्यात आला होता. अपघातावर निबंध लिहावा, ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहुन वाहतुकीचे नियोजन करावे आणि अपघातग्रस्तांना मदत करावी,अशा अटींवर हा जामीन मंजूर झाला होता. या शिक्षेच्या तरतुदीनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.