Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजराती बिल्डरने नाकारलं मराठी माणसाला घर

गुजराती बिल्डरने नाकारलं मराठी माणसाला घर


मुंबईत मराठी माणसाला एका गुजराती बिल्डरने घ नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलेपार्ले येथील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. चिकन मटण खात असाल तर घर मिळणार नाही, असा फतवाच या बिल्डरने काढला आहे. ही बाब उघडकीस येताच अनेकांनी संताप व्यक्त केला.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे. महापालिकेचा आदेश असूनही दुकानावर मराठी पाट्या न लावणे, तसेच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस केले जात आहे. अलीकडेच एका गुजरातच्या कंपनीने नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलल्याचा प्रकार घडला होता.


या कंपनीने गिरगावातील कार्यालयासाठी एक जाहिरात काढली होती. पण मराठी उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, असा स्पष्ट उल्लेख या जाहिरातीत करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. शिवसेना ठाकरे गटाने यावरून सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले होते.

ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील विलेपार्ले येथे एका महिलेला गुजराती बिल्डरने चक्क घर नाकारल्याची घटना समोर आली आहे. अमित जैन असं घर नाकारणाऱ्या बिल्डरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुईली शेंडे ही महिला विलेपार्ले येथील एका सोसायटीत किरायाने घर शोधण्यासाठी गेली होती.

यावेळी गुजराती बिल्डर अमित जैन याने नॉनव्हेज खात असाल, तर घर मिळणार नाही, असं शेंडे यांना सांगितलं. त्याचबरोबर मराठी असल्याचं कळताच त्याने घराचा किराया देखील वाढवून सांगितला. यावर शेंडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तातडीने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत संपर्क साधला.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी तातडीने विलेपार्ले येथे धाव घेत बिल्डर अमित जैन याच्या ऑफिसला घेराव घातला. दरम्यान, यापुढे मराठी माणसांना घर नाकारले किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर देण्यास मज्जाव केला तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा अनिल परब यांनी बिल्डर अमित जैनला दिला. यानंतर जैन याने माफी मागत आपली चूक मान्य केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.