Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर, तासगाव - कवठेमहाकांळला विधानसभा समीकरण बदलणार

लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर, तासगाव - कवठेमहाकांळला विधानसभा समीकरण बदलणार 


तासगाव : यंदाची सांगली लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलणारी ठरली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाशी राष्ट्रवादीशी सलगी निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.


काँग्रेसचे विशाल पाटील यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात राहून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली विशाल पाटलांच्या पाठीशी उघडपणे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठबळ उभा केले. आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील यांनीही घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे गट खासदार पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा राहत होता तर आमदार गटाकडून 'आपलाच आमदार आणि आपलाच खासदार' अशी सेटलमेंटची भूमिका घेऊन सोयीस्कर मतदान केले जात होते. मात्र यावेळी सगळीच राजकीय समीकरणे बदलली आमदार आणि सरकार गटाने एकत्रित येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली.
खासदार पाटील यांचे होमग्राऊंड असले तरी यावेळी आमदार आणि सरकार गट खासदार पाटील यांच्या विरोधात एकत्रित आले. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी यानिमित्ताने राष्ट्रवादीचा आमदार सुमनताई पाटील आणि माजी राज्यमंत्री घोरपडे यांचा गट एकत्रित आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून विधानसभा निवडणुकीची पायाभरणी झाल्याची चर्चा होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आगामी विधानसभा करिता पथ्यावर पडणारी ठरली आहे.

प्रभाकर पाटलांच्या लॉन्चिंगने सेटलमेंट थांबली

वर्षभरापूर्वी खासदार संजय पाटील यांनी त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांचे विधानसभेसाठी लॉन्चिंग केले. प्रभाकर पाटील वर्षभरापासून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशागत करताना दिसून येत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजपकडून प्रभाकर पाटील यांचे लॉन्चिंग झाल्यामुळे, राष्ट्रवादीने ' आमचाच आमदार आणि आमचाच खासदार ' असा सेटलमेंटचा अजेंडा थांबवला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.