Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निकालावरून पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

निकालावरून पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त 


सध्या चावडी पासून ते मॉलपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. निकालावरुन पैजाही लागत आहेत. मात्र तुम्ही असा काही विचार करात असाल तर सावधान. कारण सांगलीत निवडणुकीची पैज लावणे दोन मित्रांना महागात पडलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ...

सांगली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश जाधव आणि गौस मुलाणी, असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील हे निवडून येतील आणि शिरढोणचे गौस मुलाणी यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून येतील अशी पैज लावली होती. पैजेचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. मात्र तो त्यांना महागात पडलाय. कवठेमहांकाळ पोलिसांनी या पैजेची गंभीर दखल घेत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्या. विशाल पाटील निवडून आले तर रमेश जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी (क्रमांक एमएच-10-डीएच- 8800) गौस मुलाणी यांना देण्यात येईल. तर संजयकाका पाटील निवडून आले तर मुलाणी यांच्याकडून बुलेट गाडी (क्रमांक एमएच-10-डीएफ-1126) जाधव यांना देण्याची पैज जाहीर केली होती.

सांगलीची निवडणूक तिरंगी झाल्यामुळे चुरसं वाढलीय. मविआचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत आहे. त्यामुळे या दोन मित्रांना पैज लावण्याचा मोह आवरता आला नाही. केवळ सांगलीच नाही तर अनेक ठिकाणी कोण खासदार होणार पासून ते पंतप्रधान कोण होणार ? यावर पैजा लागत आहेत. मात्र सांगलीत पोलिसांनी या दोन मित्रांच्या गाड्या जप्त करत निवडणूक निकालापूर्वीच त्यांच्या पैजेचा 'निकाल' लावलाय. त्यामुळं पैजेचा डाव न खेळलेलाच बरा...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.