Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हिल हॉस्पिटलच्या विविध समस्यावर बैठक संपन्न

सिव्हिल हॉस्पिटलच्या विविध समस्यावर बैठक संपन्न 


सांगली,ता.२२ ः ‘सिव्हिल’च्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी शासन यंत्रणेवर नागरिकांचा दबाव तयार करण्यात यावा. रुग्ण हक्क समिती स्थापण करणे, मंत्री,स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांना निवेदने देणे, सांगली-मिरजेतील रुग्णालयांतील रेंगाळलेल्या कामांसाठी निधी उभा करणे आदी निर्णय आज येथे सर्वपक्षीय बैठकीत झाला. येथील कष्टकऱ्यांच्या दौलत सभागृहात झालेल्या या बैठकीसाठी शहरातील लोकप्रतिनिधींबरोबरच सिव्हिल रुग्णालयाबाबत संवेदनशील डॉक्टर्स, नागरिक उपस्थित होते.


‘सिव्हिल’चे औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.राजेंद्र भागवत, पुर्वीचे सहयोगी प्राध्यापक डॉ.बिंदूसार पलंगे, उदय जगदाळे, डॉ.प्रसाद चिटणीस यांनी रुग्‍णालयाची सध्यस्थिती आणि अडचणींबाबत सांगितले. श्री भागवत म्हणाले,‘‘ सांगली आणि मिरजेतील दोन्ही रुग्णालये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे येतात. त्यांची ही संलग्नता कायम ठेवली पाहिजे. या रुग्णालयाचा कणा म्हणजे इथे काम करणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी चांगली वसतीगृहे-स्वच्छतागृहे उभी करण्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. महाविद्यालयाशी संबंधित दोन्ही स्थानिक विकास समित्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल. 
मणुष्यबळाचा मोठी कमतरता असून शंभरावर चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर कंत्राटी पध्दतीने गाडा हाकला जात आहे. याशिवाय सांगलीत पाचशे बेडच्या स्वतंत्र रुग्णालयाचा प्रस्ताव रेंगाळला आहे. सध्या अनेक बांधकामे अपुर्ण आहेत.  त्यासाठी निधी नाही. देखभाल दुरुस्तीसाठी आलेला निधी संपला आहे. कामे मात्र पुर्ण नाहीत. सांगली-मिरजेतील रुग्णालये केवळ सांगली जिल्ह्याचे नसून उत्तर कर्नाटक, कोल्हापूर-सोलापूरमधून रुग्ण येतात. संपुर्ण जिल्ह्यातील आमदारांनी यासाठी विकास निधी वर्ग केला पाहिजे. जिल्हा नियोजन निधीतून दरवर्षी त्यासाठी तरतूद केली पाहिजे.’’

सामाजिक कार्यकर्ते उदय जगदाळे म्हणाले,‘‘ रुग्णालयाच्या कारभारात अमुलाग्र बदल झाला पाहिजे. नागरिकांच्या दबावाने चित्र बदलू शकते. इथल्या विकासासाठी उद्योगांकडून सीएसआर फंड उभा केला पाहिजे. पुण्यातील ससून किंवा नागपूरमधील रुग्णालयांचा झालेला विकास आरसा आहे. नागरिकांनी निरंतरपणे पाठपुरावा केला तर गरीबांसाठीची ही आरोग्यव्यवस्था टिकणार आहे. सध्याची अनागोंदी संपवण्यासाठी संघटित प्रयत्न झाले पाहिजेत.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे म्हणाले,‘‘ सांगली आणि मिरजेतील दोन्ही रुग्णालय परिसराचा विकास आराखडा तयार केला पाहिजे. त्यानुसारच इथे नव्या इमारती झाल्या पाहिजे. सध्या मनमानी पध्दतीने कोठेही इमारती उभ्या केल्या जात आहेत. अधिष्ठांतासमेवत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आधी समजून घेतल्या पाहिजेत. नागरिकांची स्थानिक रुग्ण हक्क व विकास समिती स्थापन करून या समितीमार्फत मागण्यांचा पाठपुरावा केला पाहिजे.’’

काँग्रेसचे रवींद्र वळवडे म्हणाले,‘‘ अधिष्ठातांपासून शिपायांपर्यंतचे कर्मचाऱ्यांमध्ये आपण रुग्णांप्रती उत्तरदायी आहोत ही भावना रुजवली पाहिजे. आम्ही माहिती अधिकारात पाठपुरावा केला तरी त्याची उत्तरे टाळली जातात. हरित न्यायालयात याचिका दाखल करून आम्ही  इथल्या ड्रेनेजबाबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे. ’’ नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले,‘‘ सिव्हिलमध्ये विकासासाठी झालेल्या खर्चाचा ताळमेळच लागत नाही. देखभाल दुरुस्तीसाठी आलेला ११ कोटींचा निधी नेमका कोठे खर्च झाला याचा खुलासा बांधकाम विभागाने केला पाहिजे.’’
बैठकीतील चर्चेत मराठा सेवा संघाचे डॉ.संजय पाटील,  संदीप दळवी, राहुल पाटील, प्रशांत भोसले, संभाजी पोळ, डॉ.विजय भोसले, ‘माकप’चे उमेश देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, नितिन चव्हाण, आनंद देसाई, राजू ऐवळे, , नंदकुमार सुर्वे, ऋषीकेश पाटील, गजानन साळुंखे, लालू मेस्त्री यांनी चर्चेत भाग घेतला.

बैठकीतील अपेक्षा-निर्णय
० जिल्हाधिकारी व अधिष्ठांतासमवेत ‘सिव्हिल’प्रश्‍नी बैठक घेणार
० सांगली-मिरजेतील रुग्णालय आवारातच नव्या विभाग व्हावेत.
० लोकप्रतिनिधींचा विकास निधी ‘सिव्हिल’साठी राखीव ठेवावा.
० प्रस्तावित बाल व महिला रुग्णालयांसाठी शासनाकडे पाठपुरावा
० सांगली-मिरजेतील रुग्णालयांचे विकास आराखडे तयार करावेत.
० ‘सीएसआर’ फंडासाठी पुण्या-मुंबईतील उद्योगांकडे पाठपुरावा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.