Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२५ हजारांची लाचप्रकरणी महिला तहसीलदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

२५ हजारांची लाचप्रकरणी महिला तहसीलदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात


चांदूरबाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक (वय ४८) यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्यासह ज्याच्या माध्यमातून लाच स्वीकारण्यात आली, त्या खाजगी संगणक परिचालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

तहसीलदार गीतांजली गरड यांनी तक्रारदाराला वडिलांच्या नावे असलेल्या शेतीच्या वाटणी पत्रानुसार फेरफार आदेश काढण्यासाठी तहसील कार्यालयातील संगणक परिचालक किरण दामोदर बेलसरे (वय २९) याच्या माध्यमातून लाच मागितली होती. दरम्यान, लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळेच संबंधित विभागाच्या पथकाने तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह खाजगी संगणक परिचालक किरण बेलसरे याला तहसील कार्यालयातून अटक केली.


तहसीलदारांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने २८ मार्च २०२४ रोजी तक्रार केली होती. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीच्या वाटणी पत्रानुसार फेरफार करण्यासाठी आदेश काढण्याकरिता संगणक परिचालक किरण बेलसरे याने तहसीलदारांसाठी २५ हजारांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद होते. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या २८ मार्चरोजी पडताळणी दरम्यान किरण बेलसरे याने तडजोडीनंतर वीस हजार रुपयाची लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतरच्या पडताळणीत गेल्या ८ मे रोजी तहसीलदार गीतांजली गरड यांनी किरण बेलसरे याला लाच स्वीकारण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शुक्रवारी २४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपीविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.