Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रम शाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी झाला

राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रम शाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी झाला 


आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडत असतात. अनेकजण आपल्यापेक्षाही जास्त यातना सहन करत असतात. परिस्थिती नसते, संधी मिळत नाही म्हणून नशिबाला दोष देत बसतात. पण एखादा जन्मताच मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला आला असेल तर...
त्यातून त्याने बडा अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले असेल तर आणि तो तसा अधिकारी झाला तर... गोष्ट आहे सांगलीच्या शिराळ्यातील बिरजूची...

आपल्या अपयशाचे खापर अनेक जण नशिबावर फोडतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात. पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरु आश्रमशाळेत घेऊन नुकताच आयएएस झालेला बिरजू गोपाल चौधरी याने हे सिद्ध करून दाखवले आहे.

२०२३-२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिरजू हे देशात १८७ व्या रैंकने उत्तीर्ण झाले. बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा. पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आले होते. दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी बसवण्याचे काम करायचे. मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून कसेबसे घर चालायचे. 

पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहित असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्‌गुरु आश्रमशाळेत पहिलीत दाखल केले. बिरजू चुणचुणीत आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणले. तो दुसऱ्या राज्यातील आहे. परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण अधुरे राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली. वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली. याच आश्रम शाळेच्या मदतीवर बिरजूने आयएएस क्रॅक केली आहे.  आपल्या यशामध्ये सद्‌गुरु आश्रमशाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली, अशा भावना बिरजू गोपाळ चौधरी यांनी व्यक्त केल्या. 

पहिली ते दहावीपर्यंतचे आश्रमशाळेतच पूर्ण केले. सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. दहावीतही ९३ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतरही परीक्षा देत राहिला आणि यूपीएससी परीक्षेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. सद्‌गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव व सर्व शिक्षकांनी बिरजूचे अभिनंदन केले.

भाषेची अडचण होती...

बिरजू लहानपणापासून शांत, संयमी आणि आज्ञाधारक होता. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होती, मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकात असायचा. खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. 
- विलास निकम, प्राथमिक शिक्षक

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.