Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठया रुग्णालयात 8 लाख सांगितला खर्च, दुसरीकडे फक्त 128 रुपयांत रुग्ण झाला बरा, हा वाद मुख्यमंत्र्यापर्यंत गेला अन...

मोठया रुग्णालयात 8 लाख सांगितला खर्च, दुसरीकडे फक्त 128 रुपयांत रुग्ण झाला बरा, हा वाद मुख्यमंत्र्यापर्यंत गेला अन...


लखनौ : डॉक्टरांना देवासमान मानलं जातं, कारण मृत्यूच्या दाढेतून माणसाला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर आपल्या वैद्यकीय सेवेतून करतात. म्हणूनच, वैद्यकीय क्षेत्राचा उल्लेख करताना आजही वैद्यकीय सेवा, असेच म्हटले जाते.

मात्र, याच वैद्यकीय क्षेत्राला काही व्यवसायिक डॉक्टरांमुळे बदनाम व्हावं लागल्याचं अनेकदा दिसून आलं. विशेष म्हणजे कोरोना काळात सर्वसामान्यांना अनेकदा याचा अनुभवही आला आहे. बहुतांश डॉक्टरांनी कोरोनाचं संकट ही सेवा करण्याची संधी मानली. तर काही डॉक्टरांनी कोरोनाचा काळ पैसे कमवण्याची संधी मानल्याचंही त्यावेळच्या अनेक घटनांवरुन दिसून आलं. मात्र, आजही समाजात अशा प्रवृत्तीचे डॉक्टर असल्याच्या घटना या ना त्या माध्यमातून समोर येत असतात. लखनौमधील अशीच एक घटना समोर आली आहे. 


ज्या रुग्णाच्या जीवाला धोका असल्याचा सांगून मेदांता हॉस्पीटलने रुग्णावरील उपचारासाठी तब्बल 8 लाख रुपयांचा खर्च सांगितला होता, त्याच रुग्णावर दुसऱ्या खासगी रुग्णालयात केवळ 128 रुपयांत उपचार करुन त्यास बरं करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णास गॅस (पित्त) समस्या झाली होती, पण मेदांता हॉस्पीटलमधील डॉक्टराने वॉल्व बदलण्याचा सल्ला संबंधित रुग्णाला दिला होता. त्यामुळे, पीडित रुग्णाचे नातेवाईकही चांगलेच घाबरले होते. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती नसल्याने नातेवाईकांनी रुग्णास उपचार करण्यासाठी इतरत्र हलवण्याचे सूचवले. त्यावेळी, तेथील डॉक्टर व स्टाफने त्यांच्याशी चुकीचं वर्तन, आणि अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार देण्यात आली आहे. तसेच, मेदांता हॉस्पीटलविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
सुशांत गोल्फ सिटीचे मोहन स्वरुप भारद्वाज यांनी 23 मे रोजी घरी मटण खाल्ल्यानंतर खाली पडले. शरारीतून घाम येऊ लागला. त्यामुळे, भाऊ व पत्नीने त्यांना मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, डॉक्टरांनी एन्जिओग्राफीसह इतरही तपासण्याच करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, वॉल्व बदलण्याचा उपचार सांगत, यासाठी 8 लाख रुपये खर्च येईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे लवकरात लवकर पैशाची सोय करा, अन्यथा उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याची भीतीही दाखवण्यात आली. त्यामुळे, पीडित नातेवाईकांनी आपल्याकडे केवळ 2 लाख रुपयेच आहेत, असे म्हणत उपचारासाठी नकार दिला. त्यामुळे, तेथील स्टाफने त्यांच्यासोबत अपमानजनक वागणूक केली. दरम्यान, मोहन यांच्या भावाने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. 

दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी गॅस (पित्त) समस्यावरील दोन इंजेक्शन देऊन काही औषधे दिली. विशेष म्हणजे केवळ 128 रुपयांत रुग्णावर उपचार झाले आणि रुग्णास डिस्चार्जही देण्यात आला. मात्र, या घटनेमुळे मेदांता हॉस्पीटल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

हॉस्पिटलने दिले स्पष्टीकरण
संबधित रुग्ण ओपीडीमध्ये छातीतील दुखणं घेऊन आले होते. त्यावेळी, तपासणीत त्यांच्या रक्तात ट्रोपोनिनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. तसेच, त्यांना ह्रदयाची समस्या असल्याचेही लक्षात आले. ईसीजीमध्ये ह्रदयासबंधित ब्लॉकेजचे संकेत मिळाले आहेत. तर, एँजिओग्राफीमध्ये समजले की एका नाडीत 100 आणि दुसऱ्या नाडीत 80 टक्के ब्लॉकेज आहे. मात्र, नातेवाईकांनी उपचारास नकार दिला, आम्ही सर्व रिपोर्ट त्यांना दिले आहेत. तसेच, स्टाफकडून कुठलाही गैरप्रकार करण्यात न आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.