महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मंगळवारी चांगलीच हजेरी घेतली. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह तब्बल १२२ कर्मचारी उशिराने कार्यालयात आले.
या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मनपातील परिचारकांना सकाळी साडेनऊ तर अधिकारी, कर्मचारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक आहे. डॉ. जावळे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात हजर झाले. यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते.
हे पाहताच आयुक्त चांगलेच संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत ते गेटवरच खुर्ची टाकून बसले. यावेळी रमतगमत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची तुमची वेळ किती वाजताची आहे आणि किती वाजले, उशीर का झाला, रोज असाच उशीर करतात का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत आयुक्तांनी लेटलतिफांना चांगलेच धारेवर धरले. तसेच साडेदहा वाजेच्यानंतर आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून उशिरा आल्याचे कारण लिहून घेतले. मनपाच्या प्रशासकीय कार्यालयात एकूण १५५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मंगळवारी यातील अवघे १६ कर्मचारी वेळेत कामावर आले तर १२२ जण उशिराने आले. उशिरा येणाऱ्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमुख यांचाही समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.