Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवजड कामासाठी चक्क अल्पवयीन मुलं कामावर; मृत्यूनंतर सत्य आलं बाहेर, कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

अवजड कामासाठी चक्क अल्पवयीन मुलं कामावर; मृत्यूनंतर सत्य आलं बाहेर, कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

वर्धा : देवळी येथील औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या एस.एम.डब्लू इस्पात कंपनीमध्ये कामावर असताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. यात एक 21 वर्षीय तर दुसरा 17 वर्षाचा कामगार कामाला होता. यात अल्पवयीन कामगाराला कामावर ठेऊन त्याच्याकडून अवजड काम करून घेतले जात होते. मात्र, अलिकडे झालेल्या कामगाराच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हे धक्कादायक प्रकरण उजेडात आले असून या प्रकरणी पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारला आहे.

व्यवस्थापनातील आठ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी देवळी पोलिसात एस. एम. डब्लू इस्पातच्या व्यवस्थापनातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव हर्षल गायकवाड असून तो कंत्राटदार आहे. तर आज अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात पेश करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने सदर संशयित आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आणखी इतर आरोपीचा शोध घेत आहे. नागपूर तसेच गुजरातमध्ये सदर आरोपी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

अल्पवयीन दोन मुलांचा मृत्यू

देवळी येथील औद्योगिक वसाहतीमधील एस.एम. इस्पात (संगम स्टील) या कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटदाराकडे कामावर असलेल्या देवळी येथील दोन कामगारांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर दोघांच्याही मृत्यूबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होत्या. नेमका मृत्यू झाला कशाने? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा होती. यात मृतक अमित प्रमोद मातकर (वय 21) आणि मृतक रितिक प्रकाश कांमडी (वय 17 वर्ष) राहणार कामडी चौक देवळी अशी मृतकांची नावे होती. अमित प्रमोद मातकर याला कामावर असताना भोवळ आल्यामुळे एक दिवसाआधी सावंगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तर दुसरा रितिक प्रकाश कामडी याला सुद्धा भोवळ आल्याने त्याला देखील रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला होता.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही, पण ज्या ठिकाणी हे कार्यरत होते त्या उद्योगात स्टील तयार केले जाते. मोठे बॉयलर आणि प्रखर आगीच्या सानिध्यात हे जड काम केले जातं. रितीक प्रकाश कामडी हा 17 वर्षाच्या बाल कामगाराला कंपनीने कामावर घेतला. बाल कामगार जड उद्योगात कामावर घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परिणामी, देवळी येथील संतोष अशोक कामडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. रितीकला कामावर घेऊन भर उन्हात अवजड पिल्लर बनविण्याचे काम करायला लावले, अल्पवयीन असताना आपल्या पुतण्याची शारीरिक कार्यक्षमता नसताना देखील कंपनी व्यवस्थापनाने त्याला काम करण्यास भाग पाडले, इत्यादि आरोप संतोष कामडी यांनी तक्रारीतून केले आहेत.

तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटदार मनु जॉर्ज, प्रतीक बिंदल, आशिष भट, ब्रिजेश यादव, श्याम मुंदडा, रमेश नाथ, प्रसाद कुकेकर, हर्षल गायकवाड या कंपनी व्यवस्थापनातील आठ जनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाल कामगार अधिनियम 1986, कारखाना अधिनियम 1948 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.