बदलापूरकरांचा संताप हा महाराष्ट्राचा प्रातिनिधिक संताप! - मधुकर भावे
२९ जून २०२४ रोजी भारतीय क्रिकेट संघाने ‘विश्वकप’ जिंकला. त्यानंतर त्यांचे मुंबईत ७ जुलै रोजी आगमन झाले. वानखेडे स्डेडियमवर त्यांचा भव्य सत्कार झाला. त्यावेळी त्यांच्या स्वागताला ८ लाख जमल्याचा अंदाज प्रसिद्ध झाला. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्राने या गर्दीवर अग्रलेख लिहिले. अग्रलेखांचा विषय असा होता की, ही ‘गर्दी’ स्वागताला झाली हे ठीक... पण, ‘जनतेच्या प्रश्नासाठी’ अशी गर्दी रस्त्यावर का उतरत नाही?...
त्या प्रश्नाला बदलापूरच्या स्थानिक जनतेनेच उत्तर दिले आहे. १० तास रेल्वे बंद करून घडलेल्या कलंकित घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला गेला. या गर्दीला कोणीही नेता नव्हता. संतापलेल्या प्रत्येकजण जागरूक नागरिकही होता आणि नेताही होता... तो शांततामय मार्गाने आपला संताप व्यक्त करीत हाेता. हा संताप ‘राजकीय नव्हता’. बदलापूरच्या शाळेत घडलेली ही घटना इतकी किळसवाणी... आणि तळपायाची आग मस्तकाला जावी, इतकी भीषण असताना हा संताप अतिशय संयत मार्गानेच व्यक्त झाला. पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, हे आता उघड झाले आहे. परंतु दुर्दैवी मुलीची आई आणि ‘दैनिक सकाळ’ची वार्ताहर मोहिनी जाधव या पत्रकार भगिनीने ज्या जिद्दीने हा विषय लावून धरला तिच्या कर्तव्याला ती जागली आणि हिमत्तीने उभी राहिली. पत्रकार जागरूक असेल तर तो छोटा असो... मोठा असो... सामाजिक जीवनात दिवसाढवळ्या होणारे अत्याचार आणि अन्याय याला निर्धाराने वाचा फोडू शकतो, हे मोहिनीने दाखवून दिले. पोलिसांच्या धाकाला ती घाबरली नाही. किंवा तिने कसलीही तडजोड केली नाही... तिच्यावरही घाणेरडे आरोप झाले ते सहन करून ती हिमतीने वस्तुनिष्ठ वार्तांकन करत होती. पत्रकारांच्या लढवय्याच्या यादीत तिचे नाव दाखल झाले. तिला पत्रकार संघटनांनी पाठींबा देवो, न देवो... हा ‘पाठींबा’ देणेसुद्धा, घडलेल्या घटनेला कोण जबाबदार आहे, त्याच्यामागे कोणता पक्ष आहे? ती संस्था कोणाची आहे? हे पाहून ठरत असतो... पत्रकारितेतही राजकारण घुसल्यानंतर सामाजिक प्रश्नाला ‘एकाकी पाडण्याचा’ प्रयत्न होतो. पण, मोहिनी जाधव या सगळ्या वातावरणात एकटी लढत राहिली. आणि म्हणून एक भयानक सामाजिक घटना वणवा पेटवून गेली. तिचे ‘अभिनंदन’ करावे, असा हा विषय नाही. पण तिच्या लढाऊ वृत्तीचा पत्रकारांना अभिमान वाटला पाहिजे, एवढे मात्र नक्की. माझ्या या नातीला पत्रकारितेच्या पुढील वाटचालीत याच निर्धाराने काम कर, अशा शुभेच्छा..
‘समुदायाचा संताप’ हा एका दिवसाचा नसतो... अनेक बारीक बारीक कारणांनी साचलेला संताप अशा या घटनेनंतर सामुदायिकरित्या व्यक्त होतो. बदलापूरातील संताप तसाच व्यक्त झाला. मानसशास्त्राचा हा नियम आहे की, एकट्याच्या संतापाची दखल घेतली जात नाही. सामुदायिक संतापाची दखल घेतली जाते. आजच्या सरकारचा यातील दोष म्हणजे हा सामाजिक संताप सरकारला समजला नाही आणि समजला असला तरी सरकारने तिथे राजकारणाच्या भावनेने बघितले, ही सरकारची पहिली चूक झाली. पुण्यात एका श्रीमंत बापाच्या लेकाने दारू पिऊन भरधाव गाडी चालवताना, एका दाम्पत्याला उडवून ठार केले. त्यावेळी याच सरकारच्या प्रतिनिधींनी अशी तातडीने प्रतिक्रिया दिली की... ‘व्यक्ती कोणीही असो... कायदा सगळ्यांना समान आहे...’
अर्थात तिथेही त्या दारू ढोसलेल्या तरुणाच्या रक्ताच्य नमुन्याच्या बाटल्या कचराकुंडीत फेकून दिल्या होत्या. तिथेही ‘राजकारण’ ‘अर्थकारण’ घडलेच होते. कोणालातरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत होता. एका सफाई कामगाराने त्या बाटल्या कचरा कुंडीतून उचलल्या त्यातूनच तो विषय उघड झाला. बदलापूरचा विषय कितीतरी पटीने अधिक गंभीर... पण ‘कायदा सगळ्यांना समान आहे’ हे सांगायला ना मुख्यमंत्री पुढे आले.... ना बदलापूरला गृहमंत्री गेले..... ना पालकमंत्री गेले.... गृहमंत्र्यांचे दूत म्हणून िगरीश महाजनांना त्या संतप्त गर्दीसमोर पाठवले गेले. त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी संतप्त जमावाला समजावण्याचा त्यांच्यापरिने प्रयत्न केला. पण, त्यांनाच एका तरुणीने प्रश्न विचारला की, ‘तुमच्या मुलीवर हा प्रसंग आला असता तर तुम्ही काय केले असते?’ या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी अक्षरश: अवंढा गिळला... ते काय उत्तर देवू शकणार होते.... एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा सगळा संतप्त जमाव बदलापूरचा होता की, बाहेरचा? ही चर्चाच मुळात निरर्थक आहे. तो समुदाय १०० टक्के बदलापूरचाच होता. पोलिसांच्या अहवालात तसे स्पष्टही झालेले आहे. अटक झालेले ७२ लोक बदलापूरचे आहेत. रेल्वे रूळांवर हजारो लोक उभे होते, ते बाहेरचे आहेत, असे आमदार किसन कथोरे हे जाहीरपणे सांगत होते. दोन्ही बाजूंच्या लोकल गाड्या ठप्प होत्या... या बातम्याही दाखवण्यात येत होत्या.
अशा स्थितीत ‘बाहेरचे लोक कुठून येणार’? महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही प्रश्नाला बगल देण्याकरिता ‘संतप्त लोक बाहेरचे होते...’ असा अप्रस्तुत खुलासा केला... लोक बाहेरचे नव्हते, हे तर स्पष्टच आहे... पण, घडलेल्या घटनेबद्दल फक्त बदलापूरकरांनाच संताप यावा, आणि बाकी महाराष्ट्रातील जनतेने त्यासाठी टाळ्या वाजवाव्या अशी अपेक्षा आहे का? ज्या मंडळींना ‘संतप्त समुदाय बाहेरचा आहे,’ असे वाटते त्यांनी आपण काय बोलतो आहोत, याचे भान ठेवावे... विषय काय आहे, त्याचे गांभीर्य काय आहे.... हे समजून न घेता राजकीय निवेदन करण्याची पहिली चूक स्थानिक आमदारांनी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली. अशी भयानक घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील बाकीच्या लोकांनी त्याबद्दल एक शब्द बोलू नये अशी अपेक्षा आहे का? सबंध महाराष्ट्रात आज असे प्रकार सर्रास घडत आहेत.... आजच्या वृत्तपत्रांत ३ ठिकाणी असे अत्याचार झाल्याच्या बातम्या एकाच दिवशी आहेत. एकप्रकारे गवताच्या गंजीवर महाराष्ट्र बसल्यासारखा आहे... लोकांचे दैनंदिन जीवन अतिशय कठीण होत चालले आहे. महागाईने लोक हैराण आहेत. आपला संसार चालवताना प्रामाणिकपणे जगणाऱ्या सामान्य माणसाला आपल्या लेकरांबद्दल काळजी वाटू नये.... असे वातावरण महाराष्ट्रात आहे का? समुदयाचा संताप हा केवळ त्यांना वाटणाऱ्या काळजीतून नाही तर सामान्य माणसांना सुरक्षा राहिलेली नाही या वस्तुस्थितीवर आहे. कारण अशा घटना घडल्यानंतर त्याचे पुढे काय होते.... आरोपींना काय शिक्षा होते.... नेमकी कारवाई काय केली जाते.. हे कोणालाही समजत नाही.... अनेक प्रकरणे अशी दडपली गेली... त्यामुळे सरकारबद्दलचा एक अविश्वास अशा संतापातून व्यक्त होतो. ही स्थिती महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यकर्त्यांना यात भूषण वाटत असेल... तर, सगळाच विषय संपला असे समजावे.... एकाही जेष्ठ नेत्याने या भीषण घटनेचा निषेध केल्याचे एकही वाक्य उच्चारलेले नाही.
त्यामुळे वातावरण संतप्त का आहे, हे समजून घ्यायचे नसेल तर मग सामाजिक परिस्थितीला प्रत्येकवेळी राजकीय फोडणी देण्याचा प्रयत्न होणार... बदलापूरच्या जनतेने ‘आताच्या आता आरोपीला फाशी द्या....’ अशी मागणी केली. त्या ‘आताच्या आत्ता’ या शब्दाचा अर्थ मनातील संताप व्यक्त होण्याकरिता आहे. त्या समुदायालाही माहिती आहे की, ‘लगेच फास आणून त्या व्यक्तिला फाशी दिले जाणार नाही’ पण, मनातील संतापाला वाट करून देण्याकरिता असेच शब्द योजावे लागतात. १९४२ च्या आंदोलनात ९ अॅागस्ट रोजी ‘चले जाव’ ही घोषणा झाली. ती संतप्त घोषणा समुदायानेच दिली होती.... त्याचा अर्थ उद्या सकाळी १० अॅागस्टला इंग्रज सरकार निघून जाईल असा नाही, हे समुदयाला समजत होते. समुदाय जेव्हा संतप्त असतो तेव्हा त्यांचा सामुदायिक विवेकही शाबूत असतोच.... पण आपला संताप व्यक्त करण्याचे शब्द त्याचे तोच शोधून काढतो.
त्यातून ती घोषणा झाली. पुरेसा संताप व्यक्त करण्याकरिता शब्द हेच साधन आहे. एवढ्या मोठ्या जमावाने ८ तास रेल्वे रोखून धरली... प्रकरण किती गंभीर अाहे, हे समुदायाला समजले... पण, शांततेचा कुठेही भंग होईल, असे कोणतेही कृत्य ८ तास समुदायाने केले नव्हते. िगरीश महाजन हे हिम्मत करून समुदायाला सामोरे गेले. संतत्प समुदायाला समोर जाण्याची गृहमंत्री फडणवीसांची हिम्मत झाली नाही. खरंम्हणजे गृहमंत्र्यांनी समोर यायला हवं... पण त्यांनी ती जबाबदारी टाळली. समुदाय हा शांततामय मार्गानेच आपला संताप व्यक्त करत होता. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर काही दगडफेक झाली असेल... पण, संतप्त जमावाने ८ तास पूर्णपणे संयम राखला, हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. अशा भयानक घटनांनंतर अशा समुदायात घुसुन समाजातील धटींगण त्याचा फायदा उठवून काहीही करू शकतात... पण, समुदयाने असा कोणताही प्रकार होऊ दिला नाही. तेव्हा संताप उस्फूर्त होता... मनापासून होता... आणि लोकांच्या मनातील ‘खदखद’ किती टोकाला पोहोचलेली आहे हे समजायला पुरेसा हाेता. सरकारला दुर्दैवाने हे कळले नाही तर उद्याच्या महाराष्ट्राचे चित्र फार भीषण आहे, असे वाटायला लागते. आता या भीषण घटनेतील उभ्या राहणाऱ्या खटल्याचे सरकारी वकील म्हणून सरकारने म्हणजे फडणवीस यांनी अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली.
समाजमाध्यमांनी त्या नेमणूकीवरही कोरडे ओढले आहेत. यापूर्वी खैरलांजी प्रकरणात सरकारी वकील म्हणून निकमच होते. दाभोळकर, पानसरे खून खटल्यातही निकमच सरकारी वकील होते. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी स्मृती डुंबरे आणि सार्थक वाकचौरे या विद्यार्थ्यांचा लोणावळा येथे दुहेरी खून झाला तेव्हाही सरकारला सामुदायिक संतापातूनच हा खटला दाखल करावा लागला. सरकारने तो खटलाही निकम यांच्याकडेच दिला. त्या खटल्यातील आरोपी निर्दोष सुटले. दलित समाजावरील अत्याचारांच्या अनेक घटनेत निकमच सरकारी वकील आहेत. त्याचे निकाल काय लागले हे आपण पाहात आहोत... कसाबला फाशी झाली हा काही निकम यांचा पराक्रम नाही... तिथे किल्ला कोर्टाबाहेर उभे राहून ‘प्रतिज्ञाापत्र’ (अॅफिडेव्हीट) करून देणारा कोणताही वकीलसुद्धा उभा असता तरी कसाबविरुद्ध ढिगभर पुरावे होते. त्यामुळे यात सरकारी वकील निकम यांचे कौशल्य काहीही नाही. तेव्हा बदलापूरच्या विषयात सरकार िकती गंभीर आहे याचाही अंदाज येऊ शकतो. सगळ्यात कमाल वाटली ती शाळेची मुख्याध्यापिका एक महिला आहे... आणि त्या मुख्याध्यापिकेने दुर्दैवी बालिकेच्या जखमा या सायकल चालवल्यामुळे झाल्या असतील, असा निष्कर्ष काढणे.... मग पालक संतापणार नाहीत... तर काय होणार? एकूणच सगळा विषय सगळा समाज संतप्त व्हावा, असाच आहे. यात राजकारण आणू नये, याबद्दल कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. किंवा व्यक्तिगत कोणी याला जबाबदार आहे, असा आरोप कोणीही केलेला नाही... पण सरकार म्हणून सरकारची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तेवढ्या गांभीर्याने सरकारमधील प्रमुखांनी पार पाडली आहे, असे समजाला अजिबात वाटत नाही... आज स्पष्ट बोलणारे कमी आहेत... स्पष्ट लिहिणारे त्याहून कमी आहेत. काहीजण धाकातून गप्प बसले आहेत.... काही संघटना संस्था कोणाची आहे, यावर त्यांच्या प्रतिक्रिया अवलंबून आहेत... ही संस्था जर सरकारविरोधील राजकीय पक्षाची असती तर याच सरकारने काय भूमिका घेतली असती? तेव्हा ‘राजकारण’ हा शब्द इतका सवंग झालेला आहे आणि सोयीचाही झालेला आहे आता जे मूग गिळून बसले आहेत... त्यांचे ‘मौन’ हेच एवढे बोलके आहे की, त्यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही.
सामुदायिक संताप हा त्या त्या वेळचा असतो. त्याचप्रमाणे अशा घटना काळाच्या ओघात लोक विसरून जातील, असाही सरकारचा विश्वास असणार... त्यामुळे दिवस निघून गेले की, लोकही या घटना विसरतील... पण या महाराष्ट्राच्या एकूण परंपरेत सध्या चौफेर ज्या दुर्दैवी काही घटना घडत आहेत त्या महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. ठाण्यातील सरस्वती शाळेतही काय घडले ते समोर आलेले आहे. ‘लाडक्या उद्योगपती’ला दिलेल्या भूखंडाबद्दल लोकांचा संतापही व्यक्त झालेला आहे. अंबरनाथमधील अत्याचाराची घटनाही अंगावर काटा आणणारी आहे. हे सगळे सामाजिक वातावरण महाराष्ट्राला कमीपणा आणणारे आहे... याची जाणीव जर सरकारलाच होणार नसेल तर मग प्रत्येक विषयात राजकारण येणार... अशा घटनांना ‘महाराष्ट्र बंद करून’त्याचा किती परिणाम होईल, हा वेगळाच विषय आहे... ‘बंद’ हा अशा घटनांविरुद्धचा पर्याय नाही...
सरकारचा धाक संपला आहे... पोिलस यंत्रणा पक्षपाती ठरत चाललेल्या आहेत, याविरोधात आवाज उठवा... आणि तो आवाज जनतेलाच उठवावा लागेल.... कारण असा आवाज उठवणारे नेतृत्त्वही तेवढेच चारित्र्यसंपन्न असायला हवे.. त्यामुळे सरकारला धाक वाटेल असे नेतृत्त्व नसले की, संपूर्ण समाज एका दडपणाखाली एका भ्ायग्रस्त स्थितीत वावरतो... बदलापूरच्या पालकांना तीच भीती वाटते आहे... हेच प्रशासनाचे अपयश आहे... त्याची चर्चा व्हायला हवी... मुक्त, मोकळ्या वातावरणात आज महाराष्ट्र वावरत नाही, एवढे नक्की... आणि हीच स्थिती अधिक चिंतादायक आहे. ‘आरोप-प्रत्यारोप’ करून हा विषय संपेल, अशी स्थिती नाही. समंजस्य भूमिका घेतल्याशिवाय महाराष्ट्र आता सुधारेल, असे वाटत नाही. सगळ्यांची कीव करावी, अशा स्थितीत आता महराष्ट्र आलेला आहे.
काल समाजमाध्यमांवर एक प्रभावी कविता िफरत होती.... बदलापूरच्या घटनेचा संदर्भ ती कविता व्हायरल होण्यामागे होता. ती कविता अटलबिहारी वजपेयींची आहे, असे सांगितले गेले होते. परंतु प्रत्यक्षात ती कविता पुष्पमित्र उपाध्याय यांची आहे. ती कोणाचीही असली तरी त्यातील भावना अटलजींच्या काव्यसंग्रहातील अशा अनेक कवितांच्या भावनांपैकीच आहे... ‘शस्त्र उठालो’ याचा आजच्या काळातील अर्थ ‘सामुदायिक संताप’ व्यक करा, असाच घ्यायचा.
सुनो द्रोपदी! शस्त्र उठालो
अब गोविंद ना आएंगे...
छोड़ो मेहंदी खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाए बैठे शकुनि,
...मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रोपदी! शस्त्र उठालो
अब गोविंद ना आएंगे...
कब तक आस लगाओगी तुम
कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से
कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से
स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचाएंगे
सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो
अब गोविंद ना आएंगे...
तुम ही कहो ये अंश्रु तुम्हारे
कल तक केवल अंधा राजा,
अब गूंगा-बहरा भी है
होंठ सिल दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है
तुम ही कहो ये अंश्रु तुम्हारे,
किसको क्या समझाएंगे?
सुनो द्रोपदी! शस्त्र उठालो
अब गोविंद ना आएंगे...
- पुष्यमित्र उपाध्याय
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.