आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचं प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. या प्रकाराने हिंदू धर्मियांच्या मनात संतापाची भावना आहे. या प्रकरणामुळे राजकारणही चांगलच तापलं आहे. या घडामोडीतच आता कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने एक आदेश दिला आहे. राज्यातील मंदिर प्रबंधन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 34 हजार मंदिरांत फक्त नंदिनी ब्रँडच्याच तुपाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा अत्यंत धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले. प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डानेच हा खुलासा केला होता.
या रिपोर्टनुसार लाडू प्रसाद तयार करताना त्यात माशांचे तेल, बीफ, प्राण्यांची चरबी या साहित्यांचा वापर केला जात होता. विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त भाविक भक्तांनाच नाही तर चक्क देवालाही अर्पण होत असतो. आता या प्रसादावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. देशभरातील हिंदू धर्मियांतही संतापाची लाट उसळली असून या प्रकाराची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकाराची देशभरात चर्चा सुरू आहे. यातच आता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व मंदिरांतील मंदिर अनुष्ठाने जसे की दिवे लावणे, प्रसाद तयार करणे, प्रसादालय या ठिकाणी फक्त नंदिनी तुपाचाच वापर करावा लागणार आहे.
मंदिर कर्मचाऱ्यांना हा आदेश
सरकारने मंदिरांतील कर्मचाऱ्यांनाही आदेश दिले आहेत. मंदिरातील प्रसादाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. राज्य सरकारच्या धार्मिक बंदोबस्ती विभागांतर्गत सर्व अधिसूचित मंदिरांत विविध धार्मिक कामांसाठी फक्त नंदिनी ब्रँडच्याच तुपाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.